बांगलादेशी महिलेला घुसखोरीप्रकरणी मांद्रे पोलिसांकडून अटक

तीन दिवसांची पोलीस कोठडी : पतीने गोव्यात आणून सोडल्याचा दावा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
28th December, 11:49 pm
बांगलादेशी महिलेला घुसखोरीप्रकरणी मांद्रे पोलिसांकडून अटक

पेडणे : हरमल येथे संशयास्पद फिरणाऱ्या ३२ वर्षीय बांगलादेशी घुसखोर महिलेला मांद्रे पोलिसांनी अटक केली. सर्मिनबीबी जनातूर शिद्दार असे या संशयित महिलेचे नाव असून तिला ३ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश पेडणे न्यायालयाने दिला आहे.

शनिवार, दि. २७ रोजी सायंकाळी ५.३५ वा. सुमारास हरमल समुद्रकिनारी भागातील वाहन पार्किंगस्थळी एक महिला संशयास्पदरित्या वावरताना आढळून आली. याबाबतची माहिती स्थानिकांकडून मिळताच मांद्रे पोलिसांनी तिला पकडून ताब्यात घेतले, तेव्हा ती बांगलादेशी घुसखोर असल्याचे आढळून आले.

संशयित महिला तीन दिवसांपूर्वीच मुंबईतून गोव्यात आली होती. ती सर्वत्र भटकत होती. हरमल येथे भटकत असताना ती पोलिसांच्या तावडीत सापडली. संशयित महिला विवाहित असून काही वर्षांपूर्वी लग्नानंतर तिच्या पतीने तिला गोव्यात आणले होते. नंतर ते बांगलादेशात परतले होते. महिनाभरापूर्वी तिला तिच्या पतीने पुन्हा भारतात घुसखोरी करून आणले. मुंबईमध्ये तिला सोडून तिचा पती निघून गेला. त्यानंतर ती गोव्यात आली होती, अशी कहाणी ती सांगत आहे.

संशयित महिलेकडे कोणत्याही प्रकारचे गोव्यात वास्तव्य करण्यासारखी कागदपत्रे नसल्याने पोलिसांनी तिच्याविरुद्ध विनापारपत्र आणि व्हिसाविना भारत तसेच गोव्यात बेकायदेशीररित्या वास्तव्य केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी गुन्हा नोंद करुन तिला अटक केली.

महिलेला पोलिसांनी रविवारी पेडणे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास पोलीस निरीक्षक गीरेंद्र नाईक हे करीत आहेत.