वाळपईत तिघांना ड्रग्जसह अटक

पोलिसांची कारवाई : अटकेतील तिघेही परप्रांतीय

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
28th December, 11:54 pm
वाळपईत तिघांना ड्रग्जसह अटक

वाळपई : येथील कदंब बसस्थानक परिसरात अमली पदार्थांच्या व्यवहारावर मोठी कारवाई करत सुमारे ३३८ ग्रॅम अमली पदार्थ जप्त केले आहेत. या प्रकरणी उत्तर प्रदेशमधील दोन व बिहारमधील एक अशा तीन परप्रांतीयांना ताब्यात घेण्यात आले आहे. तिघांना वाळपई प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयासमोर हजर केले असता, चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही व्यक्ती वाळपई कदंब बसस्थानकावर ग्राहकांना अमली पदार्थ देण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक विद्देश शिरोडकर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक प्रथमेश गावस व सोहम मळीक यांनी सापळा रचला.

शुक्रवारी रात्री उत्तर प्रदेश येथील जय शिवकुमार व प्रदीप कुमार, तसेच बिहार येथील प्रद्युमन बिन हे तिघे बसस्थानक परिसरात संशयास्पदरीत्या ग्राहकांची वाट पाहत असताना पोलिसांनी छापा टाकून अटक केली. त्यांना पोलीस स्थानकात आणल्यानंतर तपासणीदरम्यान त्यांच्याकडून ३३८ ग्रॅम अमली पदार्थ जप्त करण्यात आले. अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीतून अनेक महत्त्वाची माहिती मिळाली असून, ड्रग्ज पुरवठा करणारे तसेच हे पदार्थ घेणार असलेले ग्राहक यांच्यापर्यंत पोहोचण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे.

या घटनेवरून संबंधित आरोपी सराईत गुन्हेगार असावेत, असा संशय नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. कारण वाळपईसारख्या ग्रामीण भागात अशा प्रकारे अमली पदार्थांचा व्यवहार होणे हे अत्यंत चिंताजनक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

सखोल चौकशी करणार : शिरोडकर

या प्रकरणाची सखोल चौकशी करून कडक कारवाई केली जाईल. वाळपईसारख्या भागात अमली पदार्थांचा व्यवहार होणे दुर्दैवी आहे. या तपासातून संपूर्ण रॅकेटचा माग काढण्यात येईल, असा विश्वास या प्रकरणासंदर्भात माहिती देताना पोलीस निरीक्षक विद्देश शिरोडकर यांनी व्यक्त केला आहे.