भारतीय महिलांची ४-० ची भक्कम आघाडी

श्रीलंका ३० धावांनी पराभूत : शेफाली-स्मृतीची विक्रमी भागीदारी

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
28th December, 11:51 pm
भारतीय महिलांची ४-० ची भक्कम आघाडी

तिरुवनंतपुरम : भारतीय महिला क्रिकेट संघाने आपले विजयाचे सत्र कायम राखत श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील चौथ्या सामन्यात ३० धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकेत ४-० अशी भक्कम आघाडी घेतली आहे. फलंदाजांच्या तुफानी फटकेबाजीनंतर गोलंदाजांनी केलेल्या शिस्तबद्ध कामगिरीमुळे टीम इंडियाने श्रीलंकेला विजयापासून रोखले.श्रीलंकेची कर्णधार चमारी अटापट्टूने टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले, मात्र भारतीय सलामीवीरांनी हा निर्णय चुकीचा ठरवला. सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत शेफालीने अवघ्या ४६ चेंडूत ७९ धावा कुटल्या. यात १२ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.
त्याचबरोबर स्मृतीने आपल्या क्लासचा नमुना पेश करत ४८ चेंडूत ८० धावांची खेळी केली. तिने ११ चौकार आणि ३ उत्तुंग षटकार खेचले.डावाच्या शेवटी ऋचाने मैदानात फटक्यांची आतिषबाजी केली. तिने केवळ १६ चेंडूत नाबाद ४० धावा (४ चौकार, ३ षटकार) करत भारताला २० षटकांत २ बाद २२१ धावांपर्यंत पोहोचवले. श्रीलंकेकडून मालशा शेहानीने एकमेव बळी घेतला, मात्र इतर गोलंदाज महागडे ठरले.२२२ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. कर्णधार चमारी अटापट्टूने ५२ धावा आणि हसिनी परेराने ३३ धावा केल्या. मात्र, मधल्या फळीतील फलंदाजांना वेगवान धावा करता आल्या नाहीत. इमेशा दुलानीने २८ चेंडूत केवळ २९ धावा केल्या, ज्यामुळे श्रीलंकेवर धावांच्या गतीचा दबाव वाढला.श्रीलंकेचा संघ २० षटकांत ६ बाद १९१ धावांपर्यंतच मजल मारू शकला. भारताकडून अरुंधती रेड्डी आणि वैष्णवी शर्मा यांनी प्रत्येकी २ गडी बाद करत विजयात मोलाचा वाटा उचलला.
२०२५ च्या वनडे वर्ल्ड कपमधील शानदार कामगिरीनंतर भारतीय महिला संघाने टी-२० फॉरमॅटमध्येही आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. सलग चौथ्या विजयामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला असून आता नजरा शेवटच्या सामन्यात ‘क्लीन स्वीप’ देण्याकडे असतील.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील चौथ्या टी-२० सामन्यात भारतीय संघातील सलामीवीर फलंदाज स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांनी दमदार सुरूवात करून दिली. गेल्या तिन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आले होते. पण या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिलं. भारतीय संघाकडून डावाची सुरूवात करताना शफाली वर्मा आणि स्मृती मानधनाने मिळून पहिल्या विकेटसाठी १६२ धावांची विक्रमी भागीदारी केली.
स्मृती मानधना आणि शफाली वर्मा ही जोडी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात स्फोटक जोडींपैकी एक आहे. या जोडीने मिळून भारतीय संघाला अनेकदा दमदार सुरूवात करून दिली आहे. महिलांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रमात ही जोडी आधीपासूनच अव्वल स्थानी होती. पण आता ही जोडी ३००० धावांचा पल्ला गाठणारी पहिलीच जोडी ठरली आहे. दोघांनी मिळून टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३१०७ धावा जोडल्या आहेत. या विक्रमात ऑस्ट्रेलियाची एलिसा हेली आणि बेथ मूनीची जोडी दुसऱ्या स्थानी आहे. या जोडीच्या नावे २७२० धावा जोडण्याची नोंद आहे.
स्मृती मानधनाने २७ धावा पूर्ण करताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावा करण्याचा पल्ला गाठला आहे. यासह तिच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. भारतीय संघाची सलामीवीर फलंदाज स्मृती मानधना ही भारतीय फलंदाजीतील कणा म्हणून ओळखली जाते. डावाची सुरुवात करताना तिने अनेक महत्वाच्या सामन्यांमध्ये मोठी खेळी केली आहे. अखेर तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावा करण्याच्या विक्रमात दिग्गज खेळाडूंच्या यादीत प्रवेश केला आहे. असा पराक्रम करणारी ती जगातील चौथी फलंदाज ठरली आहे. तर सर्वात जलद १० हजार धावांचा पल्ला गाठणारी ती जगातील पहिलीच महिला फलंदाज ठरली आहे.
स्मृती मानधनाच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद
स्मृती मानधनाने आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील २८० डावात १० हजार धावांचा पल्ला गाठला आहे. या यादीत भारताची माजी कर्णधार मिताली राज अव्वल स्थानी आहे. मिताली राजच्या नावे ३१४ डावात १०८६८ धावा करण्याची नोंद आहे. तर दुसऱ्या स्थानी असलेल्या सुजी बेट्सच्या नावे ३४३ डावात १०६५२ धावा करण्याची नोंद आहे. तर तिसऱ्या स्थानी असलेल्या सी एडवर्ड्सच्या नावे ३१६ डावात १०२७३ धावा करण्याची नोंद आहे. 
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावा करणारे फलंदाज
मिताली राज (भारत) -१०,६६८ धावा, ३१४ डावात
सुजी बेट्स (न्यूझीलंड) – १०६५२ धावा , ३४३ डावात
सी एडवर्ड्स (इंग्लंड) – १०२७३ धावा, ३१६ डावात
स्मृती मानधना (भारत) – १०,००० धावा, २८० डावात

महिला टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या जोड्या
स्मृती मानधना- शफाली वर्मा (भारत)- ३१०७ धावा
एलिसा हेली- बेथ मूनी (ऑस्ट्रेलिया)- २७२० धावा
इशा ओझा- तिर्था सतीश (यूएई)- २५७९ धावा
सूजी बेट्स – सोफी डिवाईन (न्यूझीलंड)- २५५६ धावा
कविशा एगोडेगे- इशा ओझा (यूएई) – १९७६ धावा