गोवा : रेश्मा बांदोडकर, सिद्धार्थ गावस देसाई झेडपींचे अध्यक्ष

नामदेव बाबल च्यारी, अंजली अर्जुन वेळीप यांची उपाध्यक्षपदी निवड

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
46 mins ago
गोवा : रेश्मा बांदोडकर, सिद्धार्थ गावस देसाई झेडपींचे अध्यक्ष

पणजी : दोन्ही जिल्हा पंचायती काबीज केल्यानंतर भाजपने अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या नावाची घोषणा केली आहे. उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षपदी रेश्मा संदीप बांदोडकर (Reshma Bandodkar), तर उपाध्यक्षपदी नामदेव बाबल च्यारी यांची निवड झाली आहे. दक्षिण गोवा अध्यक्षपदी सिद्धार्थ गावस देसाई (Siddharth Gauns Desai), तर उपाध्यक्षपदी अंजली अर्जुन वेळीप असतील, असे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक (Damodar Naik Goa BJP President) यांनी सांगितले.

२० डिसेंबर रोजी जिल्हा पंचायतींसाठी मतदान झाले, तर २२ डिसेंबर रोजी मतमोजणी झाली. उत्तर गोव्यात २५ पैकी १८, तर दक्षिण गोव्यात २५ पैकी ११ जागा भाजपच्या पारड्यात पडल्या. युतीचा घटक असलेल्या मगोच्या ३ व इतर अपक्षांच्या साहाय्याने भाजपने दक्षिण गोव्यातही सत्ता राखली. या निवडणुकीनंतर अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपद कोणाला मिळणार याची उत्सुकता होती. यात रेईशमागूशच्या झेडपी रेश्मा बांदोडकर आणि होंडाचे झेडपी नामदेव च्यारी यांची उत्तर गोव्यात वर्णी लागली. दक्षिण गोव्यात सलग दुसऱ्यांदा झेडपी झालेले शेल्डेचे सिद्धार्थ गावस देसाई आणि बार्सेच्या झेडपी अंजली वेळीप यांची अध्यक्ष, उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. 

दरम्यान, मगो पक्षाने जिल्हा पंचायत अध्यक्ष वा उपाध्यक्षपदासाठी कोणत्याही प्रकारचा दावा न करता भाजप उमेदवारांना पाठिंबा दिला. तसेच पाठिंब्याचे पत्र मगोकडून सादर केल्याचे पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर (Deepak Dhavalikar) यांनी स्पष्ट केले.

दै. गोवन वार्ताचे वृत्त खरे ठरले

दै. गोवन वार्ताने बुधवार दि. २४ डिसेंबरच्या अंकात पान १ वर उत्तर गोवा अध्यक्षपदासाठी रेश्मा बांदोडकर, तर दक्षिण गोवा अध्यक्षपदासाठी सिद्धार्थ गावस देसाई यांची नावे शर्यतीत अग्रस्थानी असल्याचे वृत्त दिले होते. हे वृत्त खरे ठरले आहे.

हेही वाचा