चार राष्ट्रीय पुरस्कारांवर कोरले नाव

पणजी: गुजरात मधील अहमदाबाद येथे पार पडलेल्या 'इंडियन मेडिकल असोसिएशन'च्या (IMA) राष्ट्रीय परिषदेत गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या (गोमेकॉ) विद्यार्थ्यांनी आपल्या देदीप्यमान कामगिरीने गोव्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. या परिषदेत गोमेकॉच्या 'मेडिकल स्टुडंट्स नेटवर्क' (MSN) विभागाला राष्ट्रीय स्तरावरील एकूण चार महत्त्वाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. या यशामुळे राष्ट्रीय पातळीवर गोव्यातील वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
या राष्ट्रीय परिषदेत गोमेकॉच्या दिव्या गावडे यांना 'एमएसएन राष्ट्रीय सचिव प्रशंसा पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. तसेच पार्थ शिंदे यांना 'एमएसएन राष्ट्रीय अध्यक्ष प्रशंसा पुरस्कार' प्राप्त झाला, तर सूर्यम सिंग यांना त्यांच्या कौशल्याबद्दल 'उत्कृष्ट राष्ट्रीय नेतृत्व' पुरस्कार प्रदान करण्यात आला. वैयक्तिक यशासोबतच, सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमांची दखल घेत गोमेकॉच्या संपूर्ण एमएसएन विभागाला 'उत्कृष्ट सार्वजनिक सेवा' श्रेणीतील राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना गोमेकॉच्या कम्युनिटी मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. जगदीश काकोडकर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. अहमदाबाद येथील या दिमाखदार सोहळ्याला इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. दिलीप भानुशाली, माजी अध्यक्ष डॉ. आर. व्ही. अशोकन, सरचिटणीस डॉ. सरबरी दत्ता आणि डॉ. पीयुष जैन यांसारख्या वैद्यकीय क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांची उपस्थिती होती. राष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या या यशामुळे गोमेकॉ प्रशासन आणि वैद्यकीय क्षेत्रातून या विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.