इयत्ता ९वीच्या प्रश्नपत्रिकांची गुणवत्ता ब्ल्यू-प्रिंट नुसारच असावी; अन्यथा..

शालान्त मंडळाचे विद्यालयांना कडक निर्देश

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
28 mins ago
इयत्ता ९वीच्या प्रश्नपत्रिकांची गुणवत्ता ब्ल्यू-प्रिंट नुसारच असावी; अन्यथा..

पणजी: इयत्ता नववीच्या दुसऱ्या सत्राच्या प्रश्नपत्रिका तयार करण्याचे स्वातंत्र्य शाळांना दिले असले, तरी त्यांच्या दर्जावर आता गोवा शालान्त मंडळाची करडी नजर असणार आहे. विद्यालयांनी तयार केलेल्या प्रश्नपत्रिकांची मंडळाकडून विशेष समितीमार्फत छाननी केली जाईल. या तपासणीत जर प्रश्नपत्रिकांचा दर्जा सुमार आढळला किंवा त्या मंडळाच्या 'ब्ल्यू-प्रिंट'नुसार नसल्याचे स्पष्ट झाले, तर संबंधित शिक्षक आणि मुख्याध्यापकांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्याचा इशारा शालान्त मंडळाने दिला आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (NEP), नववीच्या सत्रांच्या प्रश्नपत्रिका मंडळानेच काढण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. मात्र, ताज्या निर्णयानुसार दुसऱ्या सत्राच्या प्रश्नपत्रिका काढण्याचे अधिकार शाळांना देण्यात आले आहेत. असे असले तरी, प्रश्नपत्रिकांचा आराखडा आणि काठिण्य पातळी (Difficulty Level) बोर्डाच्या मानकांनुसारच राखली जावी, यासाठी मंडळाने प्रत्येक विषयासाठी एक निश्चित ब्ल्यू-प्रिंट तयार केली आहे. सर्व शिक्षकांना याच नमुन्याचे पालन करून प्रश्नपत्रिका काढाव्या लागणार आहेत.

या प्रक्रियेत पारदर्शकता आणि गांभीर्य राखण्यासाठी मंडळाने शाळांना कडक सूचना दिल्या आहेत. नववीची परीक्षा संपल्यानंतर पाच दिवसांच्या आत प्रत्येक विद्यालयाला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका एका बंद पाकिटात सीलबंद करून शालान्त मंडळाकडे जमा करणे बंधनकारक आहे. या प्रश्नपत्रिकांची तपासणी करण्यासाठी मंडळाकडून एका विशेष समितीची स्थापना केली जाणार आहे. ही समिती प्रत्येक शाळेच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा आणि ती ब्ल्यू-प्रिंटनुसार आहे का, याची सखोल छाननी करेल.

एखाद्या शाळेची प्रश्नपत्रिका निकृष्ट दर्जाची आढळल्यास, मंडळाकडून संबंधित विद्यालयाला त्याबाबत विचारणा केली जाईल. अशा वेळी संबंधित शिक्षकाला किंवा मुख्याध्यापकाला लेखी स्पष्टीकरण द्यावे लागेल. जर हे स्पष्टीकरण समाधानकारक नसेल किंवा प्रश्नपत्रिकेत गंभीर त्रुटी आढळल्या, तर मंडळाला संबंधित जबाबदार व्यक्तीवर प्रशासकीय कारवाई करण्याचे पूर्ण अधिकार आहेत. दरम्यान, नववीची ही परीक्षा ४ मार्च ते १२ मार्च २०२६ या कालावधीत होणार असून, मंडळाने त्याचे वेळापत्रक आधीच निश्चित केले आहे. या निर्णयामुळे आता शिक्षकांना प्रश्नपत्रिका तयार करताना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.

हेही वाचा