गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेला भेडसावतेय वाहनांची तीव्र टंचाई

काम झाले विस्कळीत

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
35 mins ago
गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेला भेडसावतेय वाहनांची तीव्र टंचाई

पणजी: गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेची एकमेव जुनाट 'बोलेरो' नादुरुस्त होऊन पोलीस मोटर वाहतूक  विभागाच्या गॅरेजमध्ये धूळ खात पडली आहे. विशेष म्हणजे, गुन्हे शाखेला पोलीस खात्याकडून दोन नवीन वाहनांची मंजुरी मिळाली असतानाही, एमटी विभागाकडून ती उपलब्ध करून दिली जात नसल्याने सध्या या विभागाला गंभीर वाहन टंचाईचा सामना करावा लागत आहे.

गुन्हे शाखेची कार्यकक्षा संपूर्ण गोवाभर विस्तारलेली आहे. राज्यात कुठेही छापेमारी करणे असो किंवा अटक केलेल्या संशयित गुन्हेगारांना न्यायालयात हजर करणे असो, यासाठी वाहनाची अत्यंत गरज भासते. सध्या गुन्हे शाखेकडे असलेली एकमेव जीप संशयितांना न्यायालयात नेण्यासाठी किंवा वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यासाठी वापरली जात होती. मात्र, नुकताच एक गंभीर प्रकार घडला. कोलवाळ कारागृहातील एका संशयिताला पणजी न्यायालयात नेत असताना, म्हापसा येथील पेडे महामार्गावर ही जीप अचानक बंद पडली. गाडीच्या चाकाचा 'लोअर आर्म स्क्रू' तुटल्याने हा बिघाड झाला. अखेर अमली पदार्थ विरोधी पथकाच्या गाडीतून त्या संशयिताला न्यायालयात नेण्यात आले.

ही जीप दहा वर्षांपूर्वीची असून ती वारंवार नादुरुस्त होत असल्याने गुन्हे शाखेने नवीन दोन वाहनांची मागणी केली होती. या मागणीला पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस महासंचालकांनी वर्षभरापूर्वीच मंजुरी दिली आहे. असे असूनही, मोटर वाहतूक विभागाकडून ही वाहने सुपूर्द करण्यास टाळाटाळ का केली जात आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. सरकारकडून पोलीस खात्याला नवीन वाहने मिळत असताना, गुन्हे शाखेसारख्या अत्यंत सक्रिय विभागाला त्यातून का वंचित ठेवले जात आहे, याबद्दल पोलीस अधिकाऱ्यांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे.

सध्या गुन्हे शाखेत १० पोलीस निरीक्षक आणि ४ उपनिरीक्षक असा मोठा फौजफाटा तैनात आहे. एकाच वेळी वेगवेगळ्या न्यायालयात संशयितांना हजर करावे लागते, अशा वेळी वाहन नसल्यामुळे अधिकाऱ्यांची मोठी ओढाताण होत आहे. अनेकदा तर पोलीस अधिकाऱ्यांना आपल्या खासगी वाहनांचा वापर करावा लागतो. रात्रीची गस्त घालण्यासाठीही वाहनांची कमतरता भासत असून, एमटी विभागाकडे वारंवार विनंती करूनही या समस्येवर अद्याप तोडगा निघालेला नाही. गेल्या पाच दिवसांपासून ही एकमेव गाडी देखील बंद असल्याने गुन्हे शाखेचे कामकाज विस्कळीत झाले आहे.

हेही वाचा