पाच बडे मासे पोलिसांच्या गळाला, अन्य एकाचा शोध सुरू.

नवी दिल्ली: देशातील पॉश वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुरुग्राममधील 'डीएलएफ कॅमेलियास' आणि दिल्लीतील 'ॲम्बियन्स मॉल' यांसारख्या आलिशान मालमत्तांच्या नावे अनेकांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा दिल्ली गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. बनावट बँक कागदपत्रे आणि लिलावाचे खोटे दावे करून सुमारे २०० कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक करणाऱ्या या रॅकेटमधील मुख्य सूत्रधार मोहित गोगिया याच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे देशभरातली लक्झरी रिअल इस्टेट खरेदीदारांमध्ये मोठी खळबळ माजली आहे.
या प्रकरणाचा तपास दिल्लीच्या चाणक्यपुरी येथील गुन्हे शाखेच्या आंतरराज्य कक्षाने (ISC) केला. संशयितांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लिलावाचे बनावट प्रमाणपत्र दाखवून तक्रारदाराला गुरुग्राममधील एका प्रीमियम मालमत्तेचे आमिष दाखवले होते. या आमिषाला बळी पडून तक्रारदाराने १२.०४ कोटी रुपये आरोपींच्या खात्यावर वर्ग केले. मात्र, जेव्हा कागदपत्रांची बँकेकडून पडताळणी करण्यात आली, तेव्हा विक्री प्रमाणपत्र, लिलाव पावती आणि कव्हरिंग लेटर्स ही सर्व कागदपत्रे बनावट असल्याचे उघड झाले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दिल्ली, भोपाळ आणि मुंबईत छापे टाकले. तांत्रिक देखरेखीच्या मदतीने संशयित मोहित गोगिया याला मुंबईहून उत्तराखंडकडे पोबारा करत असताना ऋषिकेश-डेहराडून रोडवर अटक करण्यात आली.
या टोळीची कार्यपद्धती अत्यंत संघटित असून त्यांनी दिल्ली, पंजाब, मध्य प्रदेश आणि गोव्यासह अनेक राज्यांमध्ये २०० कोटींहून अधिक रुपयांवर डल्ला मारल्याचे समोर आले आहे. आरोपींविरुद्ध देशभरात १४ गुन्हे दाखल आहेत. फसवणुकीच्या पैशातून खरेदी केलेल्या दोन आलिशान गाड्या जप्त करण्यात आल्या असून, अनेक संशयास्पद बँक खाती गोठवण्यात आली आहेत. विशाल मल्होत्रा, सचिन गुलाटी, अभिनव पाठक आणि भरत छाब्रा यांसारख्या सहकाऱ्यांच्या मदतीने पैसा वेगवेगळ्या कंपन्यांमार्फत वळवला जात होता. या रॅकेटचा दुसरा मुख्य सूत्रधार राम सिंग ऊर्फ बाबाजी हा अजूनही फरार असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
बातमी अपडेट होत आहे.