युनिटी मॉल प्रकल्पाविरोधात चिंबलवासीय एकवटले; बेमुदत उपोषण केले सुरू

म्हणाले-प्रकल्प केवळ पर्यावरणासाठी घातक नाही, तर स्थानिक समुदायांच्या उपजीविकेवरही गदा आणणारा..

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
युनिटी मॉल प्रकल्पाविरोधात चिंबलवासीय एकवटले; बेमुदत उपोषण केले सुरू

पणजी : चिंबल येथील ऐतिहासिक 'तोयार' तलाव आणि पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या पाणथळ जागेवर प्रस्तावित असलेल्या 'युनिटी मॉल' प्रकल्पावरून सध्या संघर्ष पेटला आहे. पणजी सत्र न्यायालयाने या प्रकल्पाच्या बांधकामावर स्थगिती दिलेली असतानाही, प्रशासनाने नियमांचे उल्लंघन करून काम सुरू केल्याचा आरोप करत चिंबलच्या ग्रामस्थांनी रविवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. न्यायालयाचा अवमान आणि पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याच्या भावनेतून पेटलेले हे आंदोलन आता अधिक तीव्र झाले आहे.

गोवा पर्यटन विकास महामंडळातर्फे (GTDC) उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पाला ग्रामस्थांचा सुरुवातीपासूनच तीव्र विरोधाचा सामना करावा लागला आहे. चिंबल ग्रामसभेने तीन वेळा ठराव घेऊन हा प्रकल्प फेटाळून लावला होता. मात्र, जीटीडीसीने या निर्णयाला गटविकास अधिकाऱ्यांकडे (BDO) आव्हान दिले. त्यांनी अवघ्या २४ तासांत परवाना देण्याचे आदेश दिले होते. हे प्रकरण पंचायत संचालनालय आणि सरतेशेवटी सत्र न्यायालयात पोहोचले. सत्र न्यायालयाने ६ डिसेंबर रोजी या प्रकरणाला स्थगिती देऊन ८ जानेवारी २०२६ पर्यंत 'जैसे थे' परिस्थिती राखण्याचे आदेश दिले होते. मात्र, जिल्हा पंचायत निवडणुकीचे निकाल लागताच न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवून युद्धपातळीवर बांधकाम सुरू करण्यात आले, असा आरोप चिंबल जैवविविधता व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोविंद शिरोडकर यांनी केला आहे.

आंदोलक ग्रामस्थांच्या मते, हा प्रकल्प केवळ पर्यावरणासाठी घातक नाही, तर स्थानिक समुदायांच्या उपजीविकेवरही गदा आणणारा आहे. तोयार तलावाचा इतिहास अत्यंत जुना असून, १९०८ मध्ये जेव्हा पणजी शहरात पाणी टंचाई निर्माण झाली होती, तेव्हा याच तलावातून पाणीपुरवठा करण्यात आला होता. अशा ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारशाचे जतन करण्याऐवजी तिथे मॉल उभारण्याचा घाट घातला जात असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. जोपर्यंत जीटीडीसी हे काम थांबवत नाही आणि न्यायालयीन आदेशाचा मान राखला जात नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा