वाहतूक व्यवस्थापनासाठी ११०० पोलिसांची फौज

नववर्ष स्वागतासाठी ४०० अतिरिक्त पोलिसांची नियुक्ती

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
28th December, 11:34 pm
वाहतूक व्यवस्थापनासाठी ११०० पोलिसांची फौज

पणजी : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी (welcome the New Year) गोव्यात पर्यटकांची (Tourists) मोठी गर्दी होत असून, रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी आणि वाहतूक कोंडी (Traffic jam) रोखण्यासाठी गोवा पोलीस दलाने (Goa Police Force) कंबर कसली आहे. राज्याच्या विविध भागांत एकूण ११०० पोलीस तैनात करण्यात येणार असून, यामध्ये ४०० अतिरिक्त पोलिसांचा समावेश असेल, अशी माहिती वाहतूक पोलीस अधीक्षक प्रबोध शिरवईकर यांनी दिली.

पर्यटकांची सर्वाधिक गर्दी होणाऱ्या उत्तर आणि दक्षिण गोव्यातील प्रमुख किनाऱ्यांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने कळंगुट, बागा, हणजूण, वागातोर, मोरजी, हरमल, कोलवा, बोगमाळो आणि काणकोण या भागांत पोलिसांची मोठी कुमक तैनात असेल.

पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे कळंगुट परिसरात विशेष वाहतूक आराखडा लागू करण्यात येणार आहे. प्रशासनाने पार्किंगसाठी विशिष्ट जागा अधिसूचित केल्या आहेत. नो-पार्किंग क्षेत्रात वाहने उभी केल्यास नियमानुसार कडक दंड आकारला जाईल. रात्री ९ वाजेनंतर सर्व मुख्य रस्ते आणि किनारी भागांकडे जाणाऱ्या मार्गांवर नाकाबंदी केली जाईल. परराज्यातील आणि संशयास्पद वाहनांची कसून तपासणी केली जाणार आहे.

वाहतूक कोंडीचे मोठे आव्हान

पणजी, म्हापसा, मडगाव, वास्को आणि फोंडा या मुख्य शहरांत सध्या वाहनांच्या संख्येमुळे मोठी कोंडी होत आहे. पर्वरी येथे उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने तिथे आधीच वाहतुकीचा प्रश्न गंभीर आहे. नवीन वर्षाच्या गर्दीमुळे पर्वरीच्या पर्यायी रस्त्यांवरही ताण येणार असून, हे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरणार आहे. नव्या वर्षाचा आनंद साजरा करताना नियमांचे पालन करावे आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.

‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ विरोधात मोहीम

३० आणि ३१ डिसेंबर रोजी मोठ्या प्रमाणावर पार्ट्यांचे आयोजन केले जाते. पार्ट्यांनंतर मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी पोलिसांनी अल्कोमीटरद्वारे तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे शिरवईकर यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा