कासारवर्णेच्या उमेश वरकला मिळाले ‘हृदयदान’

हृदयरोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी : मदुराई येथून हेलिकॉप्टरने आणले हृदय

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
28th December, 10:58 pm
कासारवर्णेच्या उमेश वरकला मिळाले ‘हृदयदान’

पेडणे : पेडणे (Pedne) तालुक्यातील कासारवर्णे (Kasarvarne) येथील रहिवासी आणि अग्निशमन दलात (fire department) कार्यरत असलेले उमेश वरक (Umesh Varak) यांच्यावर चेन्नई येथील रुग्णालयात हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया (Heart transplant surgery) यशस्वीरीत्या पार पडली. मदुराई येथील एका १९ वर्षीय अपघातग्रस्त युवकाचे हृदय खास हेलिकॉप्टरने चेन्नईला आणून उमेश यांना नवीन आयुष्य देण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेत मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी देवदूतासारखी धाव घेत आर्थिक जबाबदारी स्वीकारल्याने उमेशला पुनर्जन्म मिळाला आहे.
उमेश वरक हे गेल्या काही काळापासून गंभीर हृदयरोगाने त्रस्त होते. सुरुवातीला मुंबईतील फोर्टिस रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. हृदय प्रत्यारोपणासाठी सुमारे ३५ ते ४० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता, जो वरक कुटुंबाच्या आर्थिक आवाक्याबाहेर होता. ही बाब समजताच आमदार जीत आरोलकर यांनी स्वतः मुंबईला जाऊन कुटुंबाची भेट घेतली आणि उपचाराचा सर्व खर्च स्वतः उचलण्याची ग्वाही दिली.
उत्तम उपचारांसाठी आमदार जीत आरोलकर यांनी उमेश यांना विमानाने चेन्नई येथील विशेष रुग्णालयात हलवले. मदुराई येथे एका १९ वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू झाला होता. त्याचे हृदय तातडीने उपलब्ध झाल्यानंतर ते विशेष हेलिकॉप्टरने चेन्नईला पोहोचवण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी केली असून, उमेश यांची प्रकृती आता सुधारत आहे.‍

आमदार जीत आरोलकरांवर कौतुकाचा वर्षाव
आमदार जीत आरोलकर हे आमच्यासाठी देवाच्या रूपात धावून आले. त्यांच्या मदतीशिवाय उमेशचा जीव वाचवणे अशक्य होते, अशा भावना वरक यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केल्या आहेत. दोन वर्षांपूर्वीच अग्निशमन दलात चालक म्हणून रुजू झालेल्या उमेशला जीवदान मिळाल्याने संपूर्ण पेडणे तालुक्यातून आमदार जीत आरोलकर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.      

हेही वाचा