नरेश सावळ, मेघश्याम राऊत यांची घोषणा : चिंतन बैठकीत घेतला जि.पं. निवडणुकीचा आढावा

पत्रकार परिषदेत माहिती देताना माजी आमदार नरेश सावळ, मेघश्याम राऊत, रामा नाईक, संदीप राऊत व इतर.
डिचोली : जिल्हा पंचायत निवडणुकीत मुख्यमंत्री, खासदार, आमदार आणि भाजपच्या संपूर्ण शक्तींविरुद्ध आम्ही दिलेला लढा उत्साहवर्धक होता. निवडणुकीत अपयश आले असले तरी आम्ही खचलेलो नाही. उलट आजपासूनच आम्ही २०२७ च्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागत आहोत, असा निर्धार डिचोलीचे माजी आमदार नरेश सावळ आणि मेघश्याम राऊत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
नुकत्याच झालेल्या जि.पं. निवडणुकीत लाटंबार्से मतदारसंघातून मेघश्याम राऊत यांनी ५,८०० मते मिळाली होती. या निकालाच्या पार्श्वभूमीवर सावळ यांच्या कार्यकर्त्यांची सर्वराज फार्म येथे चिंतन बैठक पार पडली, ज्यामध्ये पुढील रणनीतीवर चर्चा करण्यात आली.
पत्रकार परिषदेत बोलताना नरेश सावळ यांनी पुढील कामाची दिशा स्पष्ट केली. ते म्हणाले, २०२७ ची विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी आतापासूनच महिला मंडळे स्थापन करणे आणि संघटन मजबूत करण्यावर भर दिला जाईल. घरोघरी जाऊन जनसामान्यांच्या समस्या जाणून घेणे आणि सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवणे हे मुख्य काम असेल. सुडाचे राजकारण करण्याचा प्रयत्न झाल्यास गप्प न बसता कडक धोरण अवलंबले जाईल.
या बैठकीला मतदारसंघातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते, ज्यांनी झालेल्या चुका दुरुस्त करून नव्या जोमाने कामाला लागण्याचा निर्धार व्यक्त केला.
सत्ताधाऱ्यांना इशारा
मेघश्याम राऊत यांनी सांगितले की, ही निवडणूक आमदारकीच्या पातळीवर प्रतिष्ठेची मानून लढली गेली. मतदारसंघातील बेरोजगारी आणि रखडलेल्या प्रकल्पांबाबत आमचा लढा कायम राहील. निवडून आलेल्या सदस्यांनी आता केवळ राजकारण न करता जनतेची कामे आणि सेवा करण्यावर लक्ष केंद्रित करावे.
पालिका निवडणुकीबाबत मौन
डिचोली नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीबाबत विचारले असता, नरेश सावळ यांनी अद्याप कोणतीही भूमिका जाहीर केलेली नसल्याचे सांगितले. योग्य वेळी कार्यकर्त्यांशी चर्चा करून या संदर्भात निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.