
पणजी: राज्यातील दोन्ही जिल्हा पंचायतींवर आपले वर्चस्व सिद्ध केल्यानंतर, भारतीय जनता पक्षाने अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठीच्या उमेदवारांची काल सायंकाळी घोषणा केली. उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षपदी रेईशमागूश मतदारसंघातून निवडून आलेल्या रेश्मा संदीप बांदोडकर, तर उपाध्यक्षपदी होंडा मतदारसंघाचे नामदेव बाबल च्यारी यांची वर्णी लागली आहे. सोमवारी या दोन्ही नेत्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
दरम्यान, दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षपदाची धुरा शेल्डेचे सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले सदस्य सिद्धार्थ गावस देसाई यांच्याकडे सोपवण्यात आली असून, बार्से मतदारसंघाच्या अंजली अर्जुन वेळीप यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी काल सायंकाळी या नावांची अधिकृत घोषणा केली.
२० डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत भाजपने उत्तर गोव्यात १८ आणि दक्षिण गोव्यात ११ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले होते. दक्षिण गोव्यात मगो पक्षाने बिनशर्त पाठिंबा दिल्याने भाजपची दावेदारी अधिक भक्कम झाली. मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी पाठिंब्याचे पत्र सादर केल्याने या निवडीचा मार्ग मोकळा झाला. या नव्या नियुक्त्यांमुळे ग्रामीण विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास भाजप नेतृत्वाने व्यक्त केला आहे.