३ जानेवारीला विरोधकांची महत्त्वपूर्ण बैठक

पणजी: आगामी हिवाळी विधानसभा अधिवेशनात सरकारला विविध प्रश्नांवर धारेवर धरण्यासाठी विरोधी पक्ष पुन्हा एकदा 'युनायटेड अपोझिशन'च्या माध्यमातून एकवटणार आहेत. येत्या ३ जानेवारीला विरोधी पक्षांच्या सर्व आमदारांची एक संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली असून, यामध्ये अधिवेशनातील रणनीतीवर चर्चा केली जाणार असल्याची माहिती काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते युरी आलेमाव यांनी दिली आहे.
राज्याचे विधानसभा अधिवेशन १२ जानेवारी ते १६ जानेवारी या कालावधीत पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी काँग्रेस विधिमंडळ गटाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील प्रलंबित प्रश्न आणि नुकत्याच झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीच्या निकालांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विरोधी पक्षांच्या ऐक्यावर भर देत युरी आलेमाव म्हणाले की, गतवेळेप्रमाणेच याही वेळी विधानसभेत सरकारला जाब विचारण्यासाठी सर्व विरोधी आमदारांना एकत्र आणण्याचे आमचे प्रयत्न आहेत. ३ जानेवारीच्या बैठकीत नेमके कोणते विषय लावून धरायचे आणि सभागृहाची रणनीती काय असावी, यावर शिक्कामोर्तब होईल."
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपालांचे अभिभाषण होणार असल्याने प्रत्यक्ष कामकाजासाठी केवळ चार दिवस उपलब्ध असणार आहेत. राज्याचे अनेक गंभीर प्रश्न मांडण्यासाठी हा वेळ अपुरा असला, तरीही उपलब्ध वेळेत जास्तीत जास्त प्रश्न प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जाईल. विशेषतः 'बर्च बाय रोमिओ' क्लबला लागलेली आग आणि त्यामध्ये झालेल्या २५ जणांच्या मृत्यूचा मुद्दा या अधिवेशनात चांगलाच गाजण्याची चिन्हे आहेत. या दुर्घटनेवर सभागृहात विशेष चर्चेची मागणी विरोधकांकडून केली जाणार असल्याने आगामी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.