मुंगूल गँगवॉर प्रकरण: सर्व संशयितांची जामिनावर मुक्तता

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
33 mins ago
मुंगूल गँगवॉर प्रकरण: सर्व संशयितांची जामिनावर मुक्तता

मडगाव: मुंगूल येथील बहुचर्चित गँगवॉर प्रकरणातील उर्वरित ११ संशयितांना दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी सशर्त जामीन मंजूर केला. यापूर्वी १४ संशयितांना जामीन मिळाला होता, तर दोघांना आधीच मुक्त करण्यात आले होते. ताज्या निर्णयामुळे या प्रकरणातील सर्व २८ संशयितांची आता जामिनावर मुक्तता झाली आहे.

मुंगूल येथे १२ ऑगस्ट रोजी झालेल्या गँगवॉर प्रकरणी फातोर्डा पोलिसांनी २८ जणांना अटक केली होती. नोव्हेंबरमध्ये आरोपपत्र दाखल झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने संशयितांना जामीन मिळण्यास सुरुवात झाली. संशयित व्हॅली डिकॉस्टा, अमर कुलाल, वासु कुमार, मोहन अली, ज्योयस्टन फर्नांडिस, सुनील बिलावर, बाशा शेख, गौरांग कोरगावकर, राजेश वेल्मा, प्रकाश वेल्मा, अविनाश गुंजीकर, धनंजय तलवार व अक्षय तलवार यांना सशर्त जामीन मिळाला होता. गेल्या आठवड्यात संशयित अमोघ नाईक याला जामीन मिळाल्यानंतर एकूण १५ संशयितांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला होता.  सोमवारी रसूल शेख, मोहम्मद ताहीर खान, विल्सन कार्व्हालो, मलिक शेख, मंदार प्रभू, सुरज बोरकर, ओमप्रकाश मेघवाल, प्रकाश करबार, सुरज माझी, शाहरुख शेख आणि इम्रान बेपारी यांच्या अर्जावर सुनावणी झाली.

न्यायालयाने या सर्वांना ५० हजार रुपयांचा वैयक्तिक बाँड आणि तेवढ्याच रकमेचे दोन स्थानिक हमीदार सादर करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय, न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय राज्याबाहेर न जाणे, पासपोर्ट जमा करणे आणि पुराव्यांशी छेडछाड न करणे अशा कडक अटी त्यांच्यावर लादण्यात आल्या आहेत. या प्रकरणातील सर्व आरोपी आता कारागृहाबाहेर आले असले, तरी खटल्याची प्रक्रिया सुरूच राहणार आहे.


हेही वाचा