शिक्षण संचालनालयाचे सर्व शाळांना कडक निर्देश

पणजी: सुकूर-पर्वरी येथे एका सहा वर्षांच्या चिमुकलीवर स्कूल व्हॅन चालकाने केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या धक्कादायक घटनेनंतर गोवा शिक्षण खाते खडबडून जागे झाले आहे. भविष्यात अशा दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शिक्षण संचालनालयाने राज्यातील सर्व शाळांना कडक निर्देश जारी केले आहेत. यानुसार, बालरथ, स्कूल बस, व्हॅन आणि विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या इतर खासगी वाहनांच्या चालक आणि मदतनीसांची (हॅल्पर) सक्तीने पोलीस पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी यासंदर्भात सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांच्या मुख्याध्यापकांना अधिकृत परिपत्रक पाठवले आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने निश्चित केलेली मार्गदर्शक तत्त्वे आणि बाल सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करणे आता सर्व शाळा व्यवस्थापनांना बंधनकारक असेल. जोपर्यंत संबंधित चालकाचे चारित्र्य आणि पोलीस पडताळणीचे समाधानकारक प्रमाणपत्र प्राप्त होत नाही, तोपर्यंत त्या व्यक्तीला विद्यार्थ्यांची ने-आण करण्याची जबाबदारी देऊ नये, असे स्पष्टपणे बजावण्यात आले आहे.
या नियमावलीनुसार, केवळ नवीन चालकांचीच नव्हे, तर जुन्या चालकांच्या पोलीस प्रमाणपत्रांचेही वेळोवेळी नूतनीकरण करणे आवश्यक आहे. जर एखादा चालक किंवा मदतनीस बदलला, तर नवीन व्यक्तीची तातडीने पडताळणी करून घेणे अनिवार्य असेल. या सर्व कर्मचाऱ्यांच्या पोलीस पडताळणीचा तपशील एका स्वतंत्र रजिस्टरमध्ये नोंदवून ठेवावा लागणार असून, अधिकृत तपासणीच्या वेळी तो सादर करावा लागेल.
या सूचनांचे गांभीर्याने पालन करण्याची सर्वस्व जबाबदारी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक आणि व्यवस्थापनाची असेल. या परिपत्रकाकडे दुर्लक्ष करणाऱ्या किंवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही शिक्षण संचालनालयाने दिला आहे. विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा, या दृष्टीने उचललेले हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.