मराठी पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर

पणजी: दर्जेदार आशय, उत्कृष्ट मांडणी आणि वैविध्यपूर्ण साहित्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या 'गोवन वार्ता' दैनिकाच्या दिवाळी अंकाने जनमानसात मानाचे स्थान पटकावले आहे. गोवा मराठी पत्रकार संघातर्फे आयोजित २०२५ च्या दिवाळी अंक स्पर्धेत 'गोवन वार्ता'ची गोवा विभागातील 'सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक' म्हणून निवड करण्यात आली. ‘गोवन वार्ता’ला या विभागासाठीचे १० हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले आहे.

गोवा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष वामन प्रभू यांनी या स्पर्धेचे निकाल घोषित केले. या स्पर्धेमध्ये गोवा आणि महाराष्ट्र अशा दोन्ही राज्यांतून अनेक नामांकित दिवाळी अंकांनी सहभाग नोंदवला होता. गोवा विभागातून 'गोवन वार्ता'ने आपल्या साहित्यिक गुणवत्तेच्या जोरावर हे यश मिळवले. ज्येष्ठ साहित्यिक विजय कापडी, सौ. पौर्णिमा केरकर आणि चंद्रकांत गवस यांच्या परीक्षक समितीने या स्पर्धेचे परीक्षण केले.

आंतरराज्य विभागामध्ये सांगली येथील महेश कराडकर यांच्या संपादनाखालील ‘चतुरंग अन्वय’ या अंकाला २० हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक मिळाले आहे. तर मुंबईच्या ‘वसा’ आणि ‘मौज’ या अंकांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. गोवा मराठी पत्रकार संघातर्फे दरवर्षीप्रमाणे येत्या ६ जानेवारी २०२६ रोजी 'मराठी पत्रकार दिन' मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. याच दिमाखदार सोहळ्यात 'गोवन वार्ता'सह इतर विजेत्या अंकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात येईल.