जिल्हा पंचायत : द. गोव्यात विरोधकांचे एक मत फूटले; अध्यक्षपदी सिद्धार्थ तर उपाध्यक्षपदी अंजली

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
9 mins ago
जिल्हा पंचायत : द. गोव्यात विरोधकांचे एक मत फूटले; अध्यक्षपदी सिद्धार्थ तर उपाध्यक्षपदी अंजली

मडगाव : दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या (South Goa Zilla Panchayat) अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत (Election) काँग्रेसने (Congress)  भाजप (BJP) विरोधात उमेदवार उभा केला होता. काँग्रेसला ९ तर भाजपला १६ मते मिळाली. अध्यक्षपदी भाजपचे सिद्धार्थ गांवस देसाई तर उपाध्यक्षपदी अंजली वेळीप यांची निवड झाली. 

मतदाना वेळी विरोधकातील दहापैकी एकाने भाजपला मतदान केले. यामुळे विरोधकात फूट असल्याचे उघड झाले.  आता काँग्रेस, गोवा फॉरवर्ड व आपकडून एकमेकाकडे बोट दाखवण्यात येत आहे. दक्षिण गोवा अध्यक्षपदासाठी भाजपकडून सिद्धार्थ गांवस देसाई तर काँग्रेसकडून लुईझा रॉड्रिग्ज यांनी अर्ज भरले होते. उपाध्यक्षपदासाठी भाजपकडून अंजली अर्जुन वेळीप यांनी व गोवा फॉरवर्डकडून इनासिना पिंटो यांनी अर्ज सादर केले होते.  

 जिल्हा पंचायतीतील निवडणुकीत दक्षिण गोव्यात २५ पैकी ११ जागा भाजपने जिंकल्या. याशिवाय मगोचे तीन आणि अपक्ष मिळून एकूण १५ संख्याबळ भाजप व युतीतील पक्षांचे आहे. तर यावेळी काँग्रेसने जोर लावत आठ जागा जिंकल्या. यापैकी सात जागा सासष्टी तालुक्यातील आहेत. तर एक जागा ही केपेतील खोला येथील आहे. याशिवाय युतीतील गोवा फॉरवर्ड पक्षाने एक जागा जिंकल्याने काँग्रेस व गोवा फॉरवर्ड यांनी दक्षिण गोव्यात नऊ जागांवर विजय मिळवला. याशिवाय आपचा एक सदस्य कोलवा येथून निवडून आलेला आहे. त्यामुळे गोवा फॉरवर्ड, काँग्रेस व आप असे १० सदस्यांचे संख्याबळ विरोधकांकडे होते. 

 अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकी वेळी मंगळवारी दक्षिण गोव्यात सलग दुसऱ्यांदा जिल्हा पंचायत निवडणूक जिंकलेले शेल्डेचे सिद्धार्थ गावस देसाई यांना अध्यक्ष पदासाठी तर बार्सेच्या सदस्य अंजली वेळीप यांना उपाध्यक्ष पदासाठी २५ पैकी १६ मते मिळाली. तर काँग्रेसच्या लुईझा रॉड्रिग्ज व आपच्या इनासिना पिंटो यांना नऊ मते मिळाली. मतदानावेळी विरोधकांची दहा मते असताना व भाजपची पंधरा मते असताना भाजपला १६ मते मिळाली. यामुळे विरोधी पक्षातील कुणीतरी भाजपला साथ दिल्याचे स्पष्ट झाले. यामुळे विरोधकातील फूट समोर आलेली आहे. यानंतर काँग्रेसचे दक्षिण गोवा जिल्हाध्यक्ष सावियो डिसिल्वा यांनी आम आदमी पक्षावर निशाणा साधताना भाजपची बी टीम कोण हे या मतदानातून स्पष्ट झाल्याची टीका केली.



हेही वाचा