बसच्या धडकेत दुचाकीने घेतला पेट; दुचाकीस्वाराचा होरपळून मृत्यू

वेर्णा येथे अपघात : बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
38 mins ago
बसच्या धडकेत दुचाकीने घेतला पेट; दुचाकीस्वाराचा होरपळून मृत्यू

वास्को : वेर्णा येथे दुचाकीची बसला धडक बसल्याने दुचाकीने पेट घेतला. यामध्ये दुचाकीस्वार केल्विन इशांती परेरा (३२) याचा होरपळून मृत्यू झाला. याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी पंचनामा केला. तसेच बसचालक जाकीर हुसेन याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. हा अपघात रविवारी (२८ रोजी) सायंकाळी उशिरा झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केल्विन हा संगरगल्ली, गुंजी-बेळगाव येथे राहत होता. तो रविवारी सायंकाळी दुचाकीने पणजीहून मडगावच्या दिशेने चालला होता. तर बस मडगावहून वास्कोकडे चालली होती. दोन्ही वाहने वेर्णा येथील फादर आग्नेल आश्रमासमोर पोहचल्यावर बसची दुचाकीला धडक बसली. बसची जोरदार धडक बसल्याने दुचाकीने तेथेच पेट घेतला. यावेळी त्या दुचाकीखाली अडकलेल्या केल्विनने बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीचा भडका उडाल्याने त्याचा प्रयत्न फोल ठरला. तेथे जमलेल्या नागरिकांनी आग विझवून केल्विनला वाचविण्याचा प्रयत्न केला. त्याला गंभीर जखमी अवस्थेत दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात नेण्यात आले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. या अपघातप्रसंगी पोलीस निरीक्षक आनंद शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेश भोमकर पुढील तपास करीत आहेत.