गोवन वार्ताच्या ‘देवभूमी गोवा’ कॉफीटेबल बुकचे प्रकाशन

श्रीमद् विद्याधीशतीर्थ श्रीपाद वडेर स्वामी, पद्मश्री सद्गुरु ब्रह्मेशानंद आचार्य स्वामी यांच्यासह अनेकांकडून कौतुकांचा वर्षाव


42 mins ago
गोवन वार्ताच्या ‘देवभूमी गोवा’ कॉफीटेबल बुकचे प्रकाशन

‘देवभूमी गोवा’ कॉफीटेबल बुकचे प्रकाशन करताना श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामी. सोबत इतर. (नारायण पिसुर्लेकर)
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गोव्याची खरी ओळख लोकांपर्यंत पोहोचावी. येथील मंदिरे, त्यांचा इतिहास, मंदिरे वाचवण्यासाठी गोव्यातील भाविकांनी खाल्लेल्या खस्ता याची माहिती सर्वांना मिळावी या हेतूने दैनिक गोवन वार्ताने ‘देवभूमी गोवा’ हे कॉफीटेबल बुक प्रकाशित केले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन पर्तगाळी येथील जीवोत्तम मठाचे मठाधीश विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामी आणि कुंडई येथील तपोभूमीचे सद्गुरु पद्मश्री ब्रह्मेशानंद आचार्य स्वामी यांच्या हस्ते थाटात करण्यात आले. याशिवाय माशेल येथील श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण मंदिरात विशेष कार्यक्रमाचे आयोजन देवस्थान समितीने केले होते. तसेच श्री देवकीकृष्ण संस्थान, माशेल आणि फातर्पा येथील श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण मंदिरातही समितींच्या हस्ते पुस्तक प्रकाशनाचे कार्यक्रम झाले. संत, मान्यवरांसह अनेकांनी या पुस्तकाबाबत कौतुकोद्गार काढले.


पर्तगाळ येथे जीवोत्तम मठात विद्याथीश तीर्थ स्वामी यांनी पुस्तकातील माहिती जाणून घेतली आणि पुस्तकाचे कौतुक केले. असे चांगले उपक्रम गोव्याची खरी ओळख अधोरेखित करते, असे ते म्हणाले. कुंडई येथील तपोभूमी येथे झालेल्या कार्यक्रमात पद्मश्री सद्गुरु ब्रह्मेशानंद आचार्य स्वामी यांनी पुस्तकाचे प्रकाशन केले आणि गोवन वार्ताच्या कार्याचे कौतुक केले. देवभूमी पुस्तक तयार करण्याची कल्पना सूचणे हेच कौतुकास्पद आहे. या पुस्तकामुळे लोकांची गोव्याकडे पाहण्याची दृष्टी बदलेल, असे कौतुकोद्गार त्यांनी काढले. गोव्यातील मंदिरांची माहिती देणारा असा उपक्रम सुरूच ठेवा, दुसऱ्या भागात गोव्यातील इतर मंदिरांनाही स्थान द्या, अशी सूचना त्यांनी केली.


माशेल येथील श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण संस्थानात झालेल्या कार्यक्रमाला कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई आणि संस्थानचे अध्यक्ष डॉ. शिवाजी शेट उपस्थित होते. या पुस्तकातून हजारो भाविकांपर्यंत मंदिराची माहिती पोहोचणार असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. शिवाजी शेट यांनी गोव्यातील मंदिरांचा इतिहास असा दस्तावेज स्वरूपात काढल्याबद्दल गोवन वार्ताच्या कार्याचे कौतुक केले.


फातर्पा येथील श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण मंदिरातील कार्यक्रमात संस्थानचे अध्यक्ष विनोद देसाई यांनी गोवन वार्ताच्या पुस्तकामुळे मंदिराचा इतिहास अनेकांपर्यंत पोहोचणार असल्यामुळे देवीबद्दलची श्रद्धा वाढण्यास मदत होईल, असे उद्गार काढले. याच पुस्तकातून प्रेरणा घेऊन अशा प्रकारचे कॉफीटेबल बुक आपले देवस्थान तयार करण्यासाठी प्रयत्न करेल, असे ते म्हणाले.


वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या प्रकाशन सोहळ्याला प्रुडंट मीडियाचे संपादकीय संचालक प्रमोद आचार्य, गोवन वार्ताचे संपादक पांडुरंग गावकर, डीजीएम (जाहिरात) रवींद्र पाटील, अमित पोकळे, कृष्णनाथ कारबोटकर उपस्थित होते. तपोभूमी येथील कार्यक्रमात पुस्तक प्रकाशनाचा हेतू स्पष्ट करताना प्रमोद आचार्य म्हणाले, प्रत्येक देवस्थान आपल्या भाविकांना देवस्थानाची माहिती मिळावी यासाठी स्वतंत्र पुस्तक प्रका‌शित करत असते. मात्र गोव्यातील सर्व देवस्थानांची माहिती एकत्रितरीत्या देणारे पुस्तक प्रकाशित करण्याचा उपक्रम कोणी केल्याचे ऐकीवात नाही. गोव्यात येणाऱ्याच्या हाती हे पुस्तक लागले तर त्याला गोमंतकीय संस्कृती काय आहे, आपली देवस्थाने कुठे आहेत, त्यांचा इतिहास काय आहे, कोणत्या हालअपेष्टांतून आपण देवस्थाने उभी केली, सांभाळली, याचा आलेख मिळू शकतो. लवकरच ‘देवभूमी गोवा’चा दुसरा भागही प्रकाशित केला जाईल. इथे जो संकल्प केला जातो, तो निश्चित फळाला जातो, असा अनेकांचा अनुभव आहे. ‘देवभूमी गोवा’ हे संग्रही ठेवण्यासारखे आहे.
गोवन वार्ताचे संपादक पांडुरंग गांवकर यांनी देवभूमी कॉफीटेबल पुस्तकाचा दुसरा भाग लवकरच येणार असून गोव्यातील अन्य काही महत्त्वाच्या देवस्थानांचा इतिहास त्यात असेल, असे जाहीर केले.


‘देवभूमी गोवा’ पुस्तकाद्वारे गोव्यातील मंदिरे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. बाहेरील लोक गोव्याकडे भोगभूमी या दृष्टीने पाहतात. या पुस्तकामुळे त्यांची गोव्याकडे पाहण्याची दृष्टी बदलेल. अनेकांना गोव्यात मंदिरे आहेत की नाहीत, असा प्रश्न पडतो. या पुस्तकातून लोकांपर्यंत गोव्यातील मंदिरे पोहोचतील. हे पुस्तक म्हणजे ग्रंथच आहे. या ग्रंथाला उत्तम प्रतिसाद मिळावा, हीच सदिच्छा !
- पद्मश्री सद्गुरु ब्रह्मेशानंद आचार्य स्वामी, तपोभूमी, कुंडई


गोवन वार्ताचा गोव्यातील मंदिरांची माहिती एका पुस्तकात प्रसिद्ध करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे.
विजय वासुदेव धारवाडकर, पदाधिकारी, देवकीकृष्ण देवस्थान, माशेल

देवी आणि मंदिराची माहिती देण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. हे पुस्तक पाहून आम्हाला देवस्थानाची माहिती देणारे पुस्तक प्रकाशित करण्याची प्रेरणा मिळाली. पुस्तकामुळे भावकांची श्रद्धा आणखी वाढेल, असा विश्वास आहे. गोवन वार्ताच्या टीमला खूप खूप शुभेच्छा !
विनोद देसाई, अध्यक्ष, शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण संस्थान, फातर्पा


‘देवभूमी गोवा’ पुस्तकात देवीची माहिती आणि सुमारे ५०० वर्षांचा इतिहास दिला आहे. या पुस्तकाद्वारे लाखो लोकांपर्यंत आमच्या मंदिराची माहिती पोहोचणार आहे. गोवा ही देवभूमी आहे, हे पुस्तक वाचल्यानंतर सर्वांच्या लक्षात येईल.
राजेश फळदेसाई, आमदार, कुंभारजुवे


गोव्यात प्रत्येक तालुक्यांत अनेक देवस्थाने आहेत. ही देवस्थाने सकारात्मक ऊर्जा देत असतात. देवभूमी पुस्तकात मंदिरांचा इतिहास दिला आहे. पुस्तकातील छायाचित्रे आणि माहिती यांची मांडणी सुरेख आहे. या पुस्तकातील माहिती वाचून भाविकांची श्रद्धा वाढण्यास मदत होईल.

- डॉ. शिवाजी शेट, अध्यक्ष, श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण, माशेल

हेही वाचा