उर्वरित १,०२७ पदांसाठी लवकरच जाहिराती

पणजी : राज्य सरकारच्या विविध खात्यांकडून आलेल्या २,१८१ पदांच्या प्रस्तावांपैकी चालू वर्षात कर्मचारी भरती आयोगाने १,०५४ पदांसाठी जाहिराती काढून प्रक्रिया सुरू केली आहे. उर्वरित १,०२७ पदांसाठी २०२६ मध्ये जाहिराती प्रसिद्ध केल्या जातील. तसेच जानेवारीत येणाऱ्या नव्या प्रस्तावांमुळे नवीन वर्षात आयोगामार्फत मेगा भरती होणार आहे.
| विवरण | संख्या |
| सरकारकडून आलेले एकूण प्रस्ताव | २,१८१ |
| प्रक्रिया सुरू झालेली पदे (२०२५) | १,०५४ |
| शिल्लक पदे (जाहिरात २०२६ मध्ये) | १,०२७ |
| पोलीस खात्यातील पदे (सर्वाधिक) | ३७२ |
येणाऱ्या वर्षी पणजी महानगरपालिका आणि इतर नगरपालिकांच्या निवडणुकांसह फोंडा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. आचारसंहिता लागू झाली तरी ती संबंधित क्षेत्रापुरतीच मर्यादित राहील. त्यामुळे नोकरी भरती प्रक्रियेवर कोणताही परिणाम होणार नाही, असे कर्मचारी भरती आयोगाचे सचिव शशांक ठाकूर यांनी सांगितले. विविध खात्यांनी सादर केलेल्या उर्वरित पदांसाठीच्या जाहिराती पुढील वर्षी काढण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सरकारी खात्यांमधील एलडीसी, यूडीसी, तलाठी, सचिव, लेखापाल तसेच ‘क’ श्रेणीतील पदांची भरती करण्यासाठी आयोगाची स्थापना झाली. २०२३ पासून जाहिराती प्रसिद्ध होण्यास सुरुवात झाली असून, २०२३ व २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये अधिक पदांसाठी जाहिराती काढण्यात आल्या. २०२५ मध्ये एकूण १,०५४ पदांसाठी तीन जाहिराती प्रसिद्ध झाल्या.
या जाहिरातींत सहाय्यक शिक्षक, कनिष्ठ अभियंता, तांत्रिक सहाय्यक, पीएसआय, लेखापाल, ग्रंथपाल, तलाठी, पंचायत सचिव, प्रोग्रामर, मीटर रीडर, वायरमन आदी पदांचा समावेश आहे. काही पदांसाठी निवड प्रक्रिया पूर्ण होऊन उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली आहेत, तर काही पदांसाठी परीक्षा प्रक्रिया सुरू आहे.
दिनांक ५ डिसेंबर रोजी २१९ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून त्यात पंचायत सचिव व तलाठी पदांचा समावेश आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२५ आहे. या पदांसाठीच्या परीक्षा २०२६ मध्ये घेतल्या जातील.
सर्व सरकारी खात्यांना जानेवारीत रिक्त पदांचा आढावा घेऊन माहिती देणे बंधनकारक आहे. २०२५ मध्ये ५४ खात्यांनी २,१८१ पदांचे प्रस्ताव आयोगाकडे सादर केले. त्यापैकी निम्म्याहून अधिक पदांची प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्वाधिक म्हणजे पोलीस खात्याने ३७२ पदांचे प्रस्ताव दिले असून, त्यात एएसआय व शिपाई पदांची भरती सुरू आहे. यासह व्यावसायिक कर, शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, वीज, कला-संस्कृती आणि पंचायत विभाग आदी खात्यांची भरती प्रक्रिया सुरू झाली.