२०२५ मध्ये गुन्ह्यांत वाढ; तपासकामाचा वेगही सुधारला : ८७ टक्के गुन्ह्यांची उकल

म्हापसा : गोव्यात २०२५ या वर्षात गुन्ह्यांचे प्रमाण किंचित वाढले असून २१ डिसेंबरपर्यंत राज्यात २,०५० गुन्ह्यांची नोंद झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे दर महिन्याला सरासरी दोन खून आणि नऊ बलात्काराच्या घटना घडल्याचे पोलीस आकडेवारीवरून स्पष्ट झाले. मात्र, यातील १,७९४ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून हे प्रमाण ८७.५१ टक्के आहे.
दिनांक १ जानेवारी ते २१ डिसेंबर या कालावधीत राज्यात २५ खुनाच्या घटना घडल्या. त्यातील २४ गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. मात्र, मुड्डोवाडा-साळगाव येथे गेल्या नोव्हेंबरमध्ये भाड्याच्या खोलीत घडलेले रिचर्ड आगासिओ डिमेलो (रा. गिरी बार्देश) व अभिषेक उर्फ सोनू गुप्ता (रा. मध्य प्रदेश) हे दुहेरी खून प्रकरण आणि मोरजी येथील उमाकांत खोत खून प्रकरण अद्याप तपासात आहे. साळगाव प्रकरणातील संशयित जगन्नाथ भगत (रा. छत्तीसगड) आणि मोरजी प्रकरणातील मुख्य संशयित अशोक कुमार नेदूरूमाली हे अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाहीत. सदोष मनुष्यवधाच्या सर्व ३५ गुन्ह्यांचा छडा पोलिसांनी लावला आहे.
यंदा राज्यात बलात्कार किंवा लैंगिक अत्याचाराचे १०१ गुन्हे घडले. त्यातील ९८ गुन्ह्यांचा तपास लागला, तर तीन गुन्ह्यांचा तपास अजूनही लागलेला नाही. तसेच अपहरण किंवा फुस लावून पळवून नेण्याचे १०० गुन्हे घडले असून त्यापैकी ८८ गुन्ह्यांचा तपास लावण्यात आला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा या गुन्ह्यांमध्ये जवळपास १५ टक्क्यांनी वाढ झाली.
राज्यात यावर्षी चार घरांवर दरोडे पडले, ज्यामुळे संपूर्ण गोवा हादरला होता. वास्को येथील नायक कुटुंबीयांच्या घरावर पडलेल्या दरोड्यातील सर्व आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले. मात्र, दोनापावला येथील धेंपो यांच्या बंगल्यावर आणि गणेशपुरी-म्हापसा येथील डॉ. कामत घाणेकर यांच्या बंगल्यावर पडलेल्या दरोड्यातील मुख्य बांगलादेशी टोळीला गजाआड करणे पोलिसांना अद्याप शक्य झाले नाही. या टोळीला आश्रय देणाऱ्या आणि पळून जाण्यास मदत करणाऱ्या संशयितांच्या मात्र पोलिसांनी मुसक्या आवळल्या. मार्रा-पिळर्ण येथील मासळी विक्रेते पप्पू बिश्वास यांच्या घरावर पडलेल्या दरोड्यातील मुख्य संशयित आरोपी कृष्णा बेळगावकर हा अजूनही पसार असून त्याने नेपाळमध्ये आश्रय घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
जबरी चोरीच्या ८९ गुन्ह्यांपैकी फक्त ४८ गुन्ह्यांचा छडा लागला. इतर चोरीचे ३३६ गुन्हे घडले असून त्यातील २२१ गुन्ह्यांचा तपास लागला. गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेण्याचे २२ प्रकार घडले असून त्यातील १५ गुन्ह्यांचा तपास लागला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चोऱ्यांमध्ये वाढ झाली.
फसवणुकीचे १७३ प्रकार घडले असून त्यापैकी १५७ गुन्ह्यांचा छडा लागला. विश्वासघात केल्याचे ३२, तर दंगल माजवण्याचे २१ आणि बेकायदेशीर जमाव करण्याचे ३५ गुन्हे नोंद झाले असून या सर्व गुन्ह्यांचा तपास लावण्यात आला. सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची सर्व २३ प्रकरणे निकाली निघाली. प्राणघातक अपघातांच्या १४७ घटना घडल्या, त्यातील १४४ प्रकरणांचा तपास लागला.