मडगाव येथे जीसीसीआय, काशीनाथ नाईक ट्रस्टचा गौरव सोहळा

मडगाव : फोमेंतो रिसॉर्ट्सच्या अंजू तिंबलो आणि व्हिस्टियन कॉर्पोरेशनचे सचिन लवंदे यांना शनिवारी मानाचा ‘प्राईड ऑफ गोवा’ पुरस्कार देऊन सन्मानित केले. उद्योग आणि व्यवसायातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (जीसीसीआय) आणि काशीनाथ दामोदर नाईक मेमोरियल ट्रस्टने हा गौरव केला.
अंजू तिंबलो यांना ‘काशीनाथ दामोदर नाईक प्राईड ऑफ गोवा - बिझनेस लाईफटाईम अचिव्हमेंट’ पुरस्कार प्रदान केला. त्या १९९३ पासून फोमेंतो रिसॉर्ट्स अँड हॉटेल्सचे नेतृत्व करत आहेत. ताज सिदादे दे गोवा हेरिटेज आणि होरायझन यांसारख्या वास्तूंच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. ‘सासूबाईंनी मला सहा महिन्यांत कोकणी शिकवली आणि ती भाषाच या व्यवस्थेचा भाग बनण्याची गुरुकिल्ली ठरली,’ अशी आठवण अंजू तिंबलो यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितली.
सचिन लवंदे यांना ‘प्राईड ऑफ गोवा - उद्योजक’ पुरस्काराने सन्मानित केले. लवंदे हे अमेरिकेतील फॉर्च्युन ५०० कंपनी असलेल्या व्हिस्टियन कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि सीईओ आहेत. ‘मी ३५ वर्षांपूर्वी नोकरीसाठी गोवा सोडला, पण गोव्याने मला कधीच सोडले नाही. गोव्यातील तरुणांना नोकरीसाठी बाहेर जावे लागू नये म्हणून येथेच इको-सिस्टम निर्माण करण्याचे माझे ध्येय आहे,’ अशा भावना सचिन लवंदे यांनी व्यक्त केल्या.
मडगाव येथील गोमंत विद्या निकेतनच्या फोमेंतो अॅम्फीथिएटरमध्ये हा सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर उद्योगपती दत्ता दामोदर नाईक, जीसीसीआयच्या अध्यक्षा प्रतिमा धोंड, माजी अध्यक्ष श्रीनिवास धेंपो, उद्योगपती अवधूत तिंबलो, संजय आमोणकर, हर्षवर्धन भाटकुले, संदीप भंडारी आणि विजय हेदे उपस्थित होते. स्व. काशीनाथ नाईक यांच्या स्मृती जपण्यासाठी आणि यशस्वी उद्योजकांना प्रकाशझोतात आणण्यासाठी हे पुरस्कार सुरू केले, असे दत्ता नाईक यांनी प्रास्ताविकात सांगितले.
अंजू तिंबलो यांनी फोमेंतोच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथे ‘अरगीला’ लक्झरी रिसॉर्ट सुरू केल्याची माहिती दिली. तर सचिन लवंदे यांच्या नेतृत्वाखाली व्हिस्टियन कंपनीने हायब्रिड आणि इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञानात मोठी झेप घेतली असून जनरल मोटर्स, बीएमडब्ल्यू आणि ह्युंदाई सारख्या कंपन्यांशी भागीदारी केली आहे.