थंडीच्या गुलाबी रात्रीत घुमणारे सामूहिक स्वर आणि मांडावरचा उत्साह म्हणजे गोव्याचा 'धालोत्सव'. पौर्णिमा केरकर यांचा हा लेख निसर्ग, परंपरा आणि एका हळव्या लोककथेचा उलगडा करणारा आहे.

वातावरणात कडाक्याची थंडी. खूप वर्षांनी पौष मासात अशी थंडी अनुभवली. झाडांच्या पानांवरून धुक्याचे थेंब ओघळत होते. रात्रीच्या काळोखात धुक्याची चादर सर्वत्र पसरलेली होती. गोधडी घेऊन गच्च गुडूप झोपण्यासाठी अंथरुणावर पडल्या पडल्या संथ लयीतील सामूहिक स्वरांनी अंगावर रोमांच उभे राहिले. गावात धालोच्या पातीला महिला उभ्या राहिल्या आहेत, याची ती खूण होती.
हाडिले नारळ वोतिले मांडार केली पाच वळी गे
वनदेवता माया मांडार येता खेळोक दिल्या मळी गे
सर्वजणी सामूहिक गाऱ्हाणे घालतात, पातीला उभ्या राहतात आणि मग कधी हातात हात गुंफून, तर कधी कमरेभोवती हात धरून 'धालो' रुपी नृत्य, नाट्य व काव्याच्या सामूहिक आविष्काराला उत्साहाने सुरुवात होते. सलग पाच, सात किंवा नऊ दिवस गोव्याच्या विविध गावांत हा धालोत्सव साजरा करतात. याच दिवसांत कुळागरात मिरवेली माडाला घट्ट बिलगून बसलेली दिसते. निसर्गाचे सूक्ष्म निरीक्षण करता करताच त्यांना हे शब्द सुचले असावेत:
दारातल्या मिरवेली गे मिरया जाल्या भार गे
रवळनाथ देव मांडार येता घोडो सत्रेकार गे..
धालो कधी, केव्हा आणि कोठे सुरू झाला असावा, याविषयी अनेक कथा आणि लोकसंकेत आहेत. 'मालून' महिना तसा धार्मिक किंवा लग्नकार्यासाठी शुभ मानला जात नाही. त्यामुळे या काळात स्त्रिया काहीशा मोकळ्या असायच्या. वायंगणी शेतीची कामे संपत आलेली असत आणि घरात धनधान्याची सुबत्ता असे. "देवाच्या बायकांनी हा धालो आरंभिला असून तीच परंपरा आम्ही पुढे चालवत आहोत," अशी कष्टकरी महिलांची धारणा आहे. 'धालो' म्हणजे परमेश्वराला मारलेली हाक किंवा 'धावो' होय, असेही लोकमत आहे.
सत्तरी तालुक्यात काही ठिकाणी धालोत्सव होत नाही, यामागची एक हृदयद्रावक कथा लोकमनात रूढ आहे. कोणे एकेकाळी, एक महिला धालोत सहभागी होण्यासाठी मांडावर यायची. तिचे घर गावापासून खूप दूर होते. रात्रीच्या निबिड काळोखातून ती एकटीच चालत यायची. वाटेत शेत लागायचे. थंडीचे दिवस असल्याने वातावरणात मोठा गारठा असे. पदरात लहान मूल असतानाही धालोची तिची ओढ कमी झाली नव्हती.
शेतात पिकांच्या रक्षणासाठी 'माळा' बांधलेला होता. रात्री जनावरे येऊ नयेत म्हणून शेतकरी तिथे माळ्यावर झोपत असत. थंडीपासून बचावासाठी माळ्याखाली 'परसो' (आग) पेटवली जाई. ती महिला मांडावर जाताना शेतातल्या माळ्यावर चढली आणि गाढ झोपलेल्या शेतकऱ्याच्या कुशीत आपल्या बाळाला झोपवून ती झपाझप पावले टाकत मांडावर गेली. रात्रभर नृत्य-गायन करून परतताना ती बाळाला घेऊन घरी जायची. दोन-तीन दिवस हे असेच चालले.
मात्र, एके दिवशी ती जेव्हा बाळाला घेण्यासाठी परत आली, तेव्हा तिथे तिला आगीच्या ज्वाळा दिसल्या. तिचा तो कोवळा जीव आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता. त्या दिवशी शेताची राखण करणारा शेतकरी बदललेला होता. अनोळखी बाळ कुशीत पाहून तो शेतकरी घाबरला आणि त्याने कसलाही विचार न करता त्या बाळाला खाली पेटणाऱ्या आगीत फेकून दिले. एका मातेच्या हृदयाचा थरकाप उडाला. ती गावाला शाप देणार, इतक्यात तिच्या ओठांतून शापवाणीऐवजी "गाव शेतीने समृद्ध होईल" असेच शुभ शब्द बाहेर पडले. तेव्हापासून त्या गावात धालोत्सव बंद पडला, मात्र गाव शेतीभाटांनी आणि कुळागरांनी निरंतर समृद्ध राहिला. ही आठवण आजही लोकमनाला अस्वस्थ करते.
धालोत्सव हा खऱ्या अर्थाने वनदेवतेचा उत्सव आहे. निसर्गाचे अतिशय बारकाईचे वर्णन या गीतांतून येते. या उत्सवातील खेळ आणि गाणी लोकपरंपरेतील स्त्रियांच्या जीवनातील अनुभवांचा शब्दरूप आविष्कार आहेत. म्हणूनच, 'धालो' हे केवळ नृत्य नसून ते एक 'निसर्गसूक्त' आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही

- पौर्णिमा केरकर
(लेखिका लोकसाहित्याच्या अभ्यासक,
कवयित्री आणि शिक्षिका आहेत.)