मूग डाळीच्या तिखट वड्या

Story: चमचमीत रविवार |
27th December, 11:35 pm
मूग डाळीच्या तिखट वड्या

साहित्य: 

 १/२ वाटी मूग डाळ,  १/२ वाटी तांदळाचे पीठ,  २ बारीक चमचे बेसन पीठ, ७-८ लसूण पाकळ्या,  १ इंच आले, ३-४ हिरव्या मिरच्या, १/२ चमचा जिरे,  १ चमचा मोहरी, ५-६ कढीपत्ता पाने, १ बारीक चमचा पांढरे तीळ,  १/४ चमचे हिंग,  १/४  चमचे हळद, १/२ वाटी पाणी, कोथिंबीर, मीठ, २ चमचे तेल


कृती:

 प्रथम मूग डाळ स्वच्छ धुवून १ तासभर पाण्यात भिजत ठेवा.१ तासानंतर डाळ पाण्यातून काढून चाळणीवर निथळत ठेवा.

त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात निथळत ठेवलेली डाळ, लसूण पाकळ्या, आले, हिरव्या मिरच्या आणि जिरे घेऊन सुरवातीला पाणी न वापरता वाटा व नंतर यामध्ये १/२ वाटी पाणी घालून अगदी बारीक वाटून घ्या.

आता गॅसवर कढईमध्ये २ चमचे तेल गरम करुन त्यात मोहरी, कढीपत्त्याची पाने, हिंग यांची खमंग फोडणी करा. त्यानंतर फोडणीमध्ये पांढरे तीळ घालून १-२ मिनिटभर परता.यानंतर यामध्ये वर तयार केलेले डाळीचे मिश्रण घालून त्यात तांदळाचे पीठ, बेसन, हळद आणि चवीनुसार मीठ घालून मंद आचेवर सर्व साहित्य चांगले एकजीव करा. २-३ मिनिटे हे सगळे परतल्यावर या मिश्रणाचा छान गोळा तयार होईल. त्यानंतर हा गोळा कढईमध्येच थोडा पसरुन ठेवा व यावर झाकण ठेवून मंद आचेवर ८-१० मिनिटे यातील डाळ चांगली शिजवा.आता गॅस बंद करा आणि पोळपाटाला थोडे तेल लावून त्यावर हे मिश्रण काढून थापा. सुरवातीला हाताने थापून घेतले की नंतर यावर लाटण्याने अगदी हलके लाटा. त्यानंतर यावर आवडीनुसार बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पांढरे तीळ घाला व मिश्रण थोडे गरम असतानाच याच्या वड्या कापा. 

आपल्या अतिशय रुचकर आणि पौष्टिक मूग डाळीच्या तिखट वड्या तयार आहेत.


- संचिता केळकर