रजनी

वडिलांचा मृत्यू त्याच दुःखात झाला आणि आईने अंथरूण धरले. लग्नानंतर आठ वर्षांनी तिला मुलगी झाली, तेव्हा छळ अधिकच वाढला. पुढे दोन मुले झाली, त्यातील एक मुलगा देवाघरी गेला. सासूने त्याचेही खापर रजनीवरच फोडले.

Story: कथा |
27th December, 11:43 pm
रजनी

बाहेर पावसाची रिपरिप सुरू होती. वातावरणात एक प्रकारचा गारवा पसरला होता. रजनी शांतपणे पडून छतावर पडणाऱ्या पावसाच्या थेंबांचा आवाज ऐकत होती. डोळे मिटलेले होते, पण मन मात्र विचारांच्या तंद्रीत होते. अंगात थोडा ताप असल्याने शरीर थकले होते. अचानक तिच्या पायावर पाण्याचे दोन उष्ण थेंब पडले आणि ती दचकून जागी झाली. तिने डोळे उघडून पाहिले, तर पायाशी तिचा नवरा बसला होता. त्याच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहत होते. जो हात एकेकाळी मारण्यासाठी उचलायचा, तोच हात आज तिचे पाय अत्यंत मायेने चेपत होता.

​तिला गलबलून आले. ती स्वतःला सावरत उठून बसली, तसा तोही भानावर आला; पण त्याने आपले अश्रू लपवण्याचा प्रयत्न केला नाही.

"काय झालं? का रडताय तुम्ही?" तिने विचारले.

त्याने तिचा हात घट्ट पकडला आणि हुंदका देत म्हणाला, "रजनी, मला सोडून जाऊ नकोस ग. मी तुझ्याशिवाय जगूच शकणार नाही."

​त्याच्या उबदार स्पर्शात रजनीला आज एक वेगळीच आर्जवी भावना जाणवली. त्या स्पर्शाने तिच्या स्मृतींना उजाळा मिळाला आणि मागच्या ४०-४२ वर्षांचा काळ एका चलतचित्रासारखा तिच्या नजरेसमोरून सरकू लागला.

​ती रजनी, आपल्या आई-वडिलांची एकुलती एक लाडकी मुलगी. गरिबीतही आई-वडिलांनी तिला फुलासारखे जपले होते. तिचे लग्न ठरले आणि गरिबी असूनही वडिलांनी ते थाटामाटात करण्याचे ठरवले. वडिलांनी सावकाराकडे शेतजमीन आणि आईचे मंगळसूत्र गहाण ठेवून पैसे उभे केले होते. "रजनी सासरी सुखात राहावी, मानपानात कुठे कमी पडू नये," हीच त्या माऊलीची आस होती. भावानेही आपल्या शिक्षणाचा विचार न करता बहिणीच्या सुखासाठी वडिलांच्या निर्णयाला साथ दिली होती.

​लग्न झाले, रजनीने सासरचे माप ओलांडले. नवीन घर, मोठे कुटुंब आणि नवी माणसे पाहून ती सुखावली होती. पण दुसऱ्याच दिवशी सासूच्या लाथेने तिची स्वप्ने भंग पावली. "उठ महाराणी, पूजा मांडायची आहे. तुझ्या बापाचं घर नाही हे," अशा सासूच्या शिव्यांच्या भूपाळीने तिच्या संसाराची सुरुवात झाली.

​त्या घरात रजनीला फक्त काम आणि मारच मिळाला. एकदा चूल फुंकताना पोळी थोडी करपली, तर सासूने रागाच्या भरात जळता निखारा तिच्या हातावर ठेवला. तो चटका हातावर बसलाच, पण तिचे संपूर्ण आयुष्यच त्या एका डागाने होरपळून निघाले. नवरा तर आणखीनच कजाग निघाला. दारूच्या नशेत तो रोज तिला मारहाण करायचा. प्रेमाचा एक शब्दही त्याच्या मुखातून कधी निघाला नाही. तिने दिवस-रात्र शेतात आणि घरात राब-राब राबले, पण पोटभर अन्न कधीच मिळाले नाही.

​वडिलांचा मृत्यू त्याच चिंतेत झाला. आईने अंथरूण धरले. माहेरच्या माणसांना सासरी नेहमीच अपमानित व्हावे लागे. रजनी मात्र "आमचे नाव राख" हा आईचा शब्द पाळत सर्व छळ मुकाट्याने सहन करत राहिली. लग्नानंतर आठ वर्षांनी तिला मुलगी झाली, तेव्हा तर "कुळवाण आली". पांढरी पाल म्हणून तिचा छळ दुप्पट झाला. पुढे देवाने तिला जुळी मुले दिली, पण त्यातील एकाचा आजारपणात मृत्यू झाला. त्याचे खापरही सासूने रजनीवरच फोडले.

​एका काळ्याकुट्ट रात्री नवऱ्याने तिला इतके निर्दयीपणे मारले की तिचा गाल फाटला. रक्तबंबाळ अवस्थेत ती आपल्या मुलीला घेऊन जीव देण्यासाठी विहिरीकडे धावली. पण विहिरीच्या काठावर उभी राहताच तिला घरात राहिलेल्या आपल्या काळजाच्या दुसऱ्या तुकड्याची, मुलाची आठवण झाली आणि तिचे पाय थबकले. ती तशीच धावत शेजारच्या एका वहिनींकडे गेली. त्या वहिनी तिच्यासाठी देवदूत ठरल्या. त्यांनी तिला आधार दिला, तिचे घाव पुसले आणि सासरच्या लोकांना कायद्याची भीती दाखवून रजनीला थोडा धीर दिला.

​अशी कित्येक वर्षे संघर्षात गेली. मुले शिकली, मोठी झाली, त्यांची लग्ने झाली. काळाच्या ओघात सासूचा दरारा संपला आणि नवऱ्याची ताकदही कमी झाली. मारझोड करणारा नवरा आता व्याधींनी ग्रासला होता. जसजसे वय वाढले, तसतसा त्याला आपल्या चुकांचा पश्चात्ताप होऊ लागला. जो माणूस कधी नीट बोलला नव्हता, तो आज तिच्या आजारपणात तिच्या पायाशी बसून रडत होता.

​"कधी काळी ज्याने शरीर ओरबाडलं, आज तोच मन जपायला बघतोय," रजनीला वाटले. तिने पाहिले की ४० वर्षांचे दुःख आज त्या दोन थेंबांत विरघळून जात आहे. तिने पाहिलेला अंधार संपून आता खऱ्या अर्थाने आयुष्यात उजेड येत होता. पतीच्या डोळ्यांतील पश्चात्तापाने तिच्या मनातील सर्व जखमा भरून आल्या होत्या. तिनेही हळुवारपणे त्याच्या हातावर हात ठेवला आणि आयुष्याच्या या वळणावर मिळालेल्या या सुखाचा स्वीकार केला.


- सौ. मन्वी मुणगेकर