वीरप्पनच्या दहशतीपासून 'पुष्पा' चित्रपटाच्या पडद्यापर्यंत दिसणारी तस्करी ही केवळ कथा नसून एक भयानक वास्तव आहे. वन्यजीव तस्करी निसर्गाचा समतोल बिघडवणारा गंभीर गुन्हा असून त्याकडे दुर्लक्ष करणे भविष्यासाठी धोक्याचे आहे.

२००४ साली यमसदनी पाठवलेला चंदन व हस्तिदंत तस्कर वीरप्पन संपूर्ण दक्षिण भारतात दहशत निर्माण करणारा गुन्हेगार म्हणून ओळखला जात होता. याच विषयावरून सुकुमार दिग्दर्शित आणि अल्लू अर्जुन अभिनित 'पुष्पा' सिनेमाला बरीच प्रसिद्धी मिळाली. लाल चंदन तस्करीवर आधारित असलेला हा सिनेमा अभिनय, दिग्दर्शन आणि उत्कृष्ट मांडणीमुळे चर्चेत आला. वृक्षांची बेकायदेशीरपणे कशाप्रकारे तस्करी केली जाते, याची झलक या चित्रपटातून पाहायला मिळाली. मात्र, फक्त वृक्षच नव्हे तर अन्य वन्यजीव देखील तस्करीचे बळी ठरतात, ही बाबही तितकीच खरी व गंभीर आहे.
वन्यजीव तस्करी म्हणजे काय?
झाडांची बेकायदेशीरपणे कत्तल करून विक्री करणे, वन्य किंवा पाळीव प्राण्यांना बेकायदेशीरपणे पकडणे, त्यांची वाहतूक करणे, विक्री करणे आणि वन्यप्राण्यांचे अवयव विकणे म्हणजेच 'वन्यजीव तस्करी' होय. दुर्मिळ वनस्पती व विदेशी पाळीव प्राण्यांची वाढती मागणी, वन्यप्राण्यांच्या अवयवांपासून बनवलेल्या सजावटीच्या वस्तू आणि पारंपरिक औषधोपचारांमधील त्यांचा वापर यांमुळे वन्यजीव धोक्यात येत आहेत.
तस्करीची प्रमुख कारणे:
१. वाढती मागणी: पोपट, साप, कासव आणि माकडे यांसारखे प्राणी पाळण्याच्या हौसेमुळे तस्करी वाढते.
२. पारंपरिक औषधे: हरीण किंवा गेंड्याचे शिंग, वाघाची हाडे, रक्त आणि मांस यांचा वापर औषधांत केला जातो. भारतातून चीनसारख्या देशांमध्ये वाघांची मोठी तस्करी होते.
३. ऐषाराम व सजावट: हत्तीचे सुळे (हस्तिदंत), वाघ, गेंडा, घोरपड व सापाची कातडी यांचा वापर महागड्या सजावटीच्या वस्तूंसाठी केला जातो.
४. अंधश्रद्धा व जादूटोणा: जादूटोणा आणि पूजेसाठी वन्यप्राण्यांच्या अवयवांचा वापर होतो. सर्वाधिक जप्त होणाऱ्या वस्तूंमध्ये घोरपडीचे वाळवलेले जननेंद्रिय समाविष्ट आहे, जे 'हठ्ठाजोडी' म्हणून चुकीच्या पद्धतीने विकले जाते. तसेच 'सियार सिंगी' (कोल्ह्याच्या कपाळावरील केसांचा पुंजका) नशीब उजळवते, असा गैरसमज पसरवला जातो.
५. इतर कारणे: पँगोलिनचे खवले, समुद्री शंख-शिंपले, कस्तुरी मृगाची कस्तुरी, मुंगूसाचे केस आणि अस्वालाचे पित्त यांचीही मोठी बेकायदेशीर बाजारपेठ आहे. काही भागांत वन्य प्राण्यांचे मांस अन्न म्हणून वापरले जाते.
कायदेशीर तरतुदी आणि वास्तव:
'वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२' नुसार वन्य प्राण्यांची शिकार, खरेदी-विक्री आणि तस्करी बेकायदेशीर आहे. संरक्षित प्रजातींच्या तस्करीसाठी कठोर दंड व कारावासाची शिक्षा आहे. सीमांवर तस्करी रोखण्यासाठी कस्टम्स विभागाला माल जप्त करण्याचे अधिकार आहेत. मात्र, तरीही जागरूकतेचा अभाव आणि कायद्याची कमकुवत अंमलबजावणी यामुळे तस्करी सुरूच आहे. गरिबी, बेरोजगारी आणि जास्तीच्या नफ्याची लालसा यामुळे अनेक लोक या गुन्हेगारीकडे वळतात.
पर्यावरणीय परिणाम आणि आपले कर्तव्य:
निसर्गाच्या साखळीत प्रत्येक जीव महत्त्वाचा असतो. तस्करीमुळे ही साखळी तुटते आणि पर्यावरणीय समतोल बिघडून प्रजाती नामशेष होण्याचा धोका वाढतो. वन्यजीवांचे रक्षण करण्यासाठी आपण सतर्क राहणे आवश्यक आहे:
वन्य प्राण्यांच्या अवयवांपासून बनवलेल्या वस्तू खरेदी करू नका.
विदेशी पाळीव प्राणी पाळणे टाळा.
तस्करीबाबतची माहिती प्रशासनाला द्या.
सार्वजनिक जैवविविधता नोंदणीमध्ये सहभाग नोंदवा.
आपल्या छोट्याशा सतर्कतेमुळे आपण पृथ्वीवरील ही अनमोल संपत्ती नष्ट होण्यापासून वाचवू शकतो.

- स्त्रिग्धरा नाईक
(लेखिका विद्युत अभियांत्रिकीच्या
प्राध्यापिका आहेत.)