भारतातील शापित-बाधित जागांचे पोस्ट-मॉर्टम!

भारतात जितकी लोकसंख्या आहे, त्यापेक्षा जास्त बहुधा आपल्याकडे 'शापित' जागा आहेत. एखाद्या रस्त्यावर दोनपेक्षा जास्त अपघात झाले की लगेच ती जागा बाधित आहे असे म्हटले जाते.

Story: मिश्किली |
27th December, 11:27 pm
भारतातील शापित-बाधित जागांचे पोस्ट-मॉर्टम!

भारतात नवीन घर किंवा फ्लॅट विकताना बिल्डर 'स्मशानभूमी' हा शब्द कधीच वापरत नाही. पण एकदा का तुम्ही तिथे फ्लॅट घेतला आणि सोसायटीत रात्रीच्या वेळी कुत्रं रडलं, की हमखास एखादा 'जाणकार' अतिविद्वान शेजारी बाहेर येतो आणि हळूच सांगतो, “अहो, हे काय असं होणारच! जिथे तुमचं किचन आहे ना, तिथे पूर्वी प्रेतं जाळायची!” तसे पृथ्वीचा करोडो वर्षांचा इतिहास पाहता, अशी कोणतीही जागा नसेल जिथे कधीकाळी कोणी मेलं नसेल किंवा कुणावर अंत्यसंस्कार झाले नसतील. म्हणजे तांत्रिकदृष्ट्या संपूर्ण विश्वच ‘वसुधैव स्मशानभूमी’ आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. मग ही भुतं फक्त नवीन बांधलेल्या पॉश सोसायट्यांमध्येच का येतात? त्यांनाही कदाचित सरकारी क्वार्टर्सपेक्षा 'प्राइम लोकेशन' आणि 'अॅमेनिटीज'ची ओढ लागली असावी!

तसेच भारतात अशी एकही शाळा किंवा महाविद्यालय नसेल, ज्याच्याबद्दल "इथे आधी स्मशानभूमी होती" ही कंड्या पिकवलेली नसेल. शाळेतल्या मुलांसाठी हे अफवेचे सर्वात मोठे 'फ्यूअल' असते. मग त्यातूनच काही मजेशीर तर्क जन्म घेतात. रात्रीच्या वेळी शाळेच्या मैदानावर भुतं पीटीचा सराव करतात, असा दावा अनेक मुलं छातीठोकपणे करतात. मुलांना अतृप्त आत्म्यांची परेड दिसते. शाळा स्मशानभूमीवर बांधली असेल, तर तिथल्या भुतांना शाळेच्या फीमध्ये सवलत मिळते का? एखाद्या दिवशी वर्गात बेंचवर कोणीच बसलेलं नसेल, तरी शिक्षक म्हणत असतील का, "चला, आज अदृश्य विद्यार्थ्यांनी पूर्ण उपस्थिती लावली आहे!" जर ती शाळा खरोखर स्मशानभूमीवर असेल, तर त्या शाळेतल्या मुलांना 'इतिहास' विषय वाचण्याची गरजच पडू नये. एखादं जुन्या काळातलं भूत वर्गात येऊन सांगू शकतं— "अरे बाळा, तो तह असा नव्हता झाला, मी स्वतः तिथे हजर होतो!" अशा भुतांना शाळेने 'गेस्ट लेक्चरर' म्हणून मानधन द्यायला हवे. शाळेत विज्ञान शिकवलं जातं, पण मधल्या सुट्टीत चर्चा मात्र "मागे वळून बघू नकोस, तिथल्या वडाच्या झाडाखाली स्मशान होतं" याच विषयावर रंगते.

आपल्याकडच्या भुतांचा, विशेषतः महिला भुतांचा ड्रेस कोड अतिशय कडक आहे. ती नेहमी पांढरी साडी नेसूनच दिसणार (दिसली तर!). मला तरी अजून कधीच भेटली नाही. एकदा रात्री बोरी पुलावर खूप वेळ थांबलो, कदाचित तिने मला 'भूत' समजून टाळलं असावं. पण बघा ना, काळ बदलला, फॅशन बदलली, पण भुतांची साडी बदलली नाही. रंगबेरंगी साडी नेसून किंवा जीन्स-टॉप घालून एखादं भूत का फिरत नाही? आणि ही पांढरी साडी इतकी लख्ख पांढरी कशी असते? रात्रीच्या अंधारातही ती 'टाइड' किंवा 'एरियल'ने धुतल्यासारखी चमकते. कदाचित भुतांच्या जगात लाँड्रीची उत्तम सोय आहे.

हमखास पडणारा एक प्रश्न हा की भूत कोणत्या भाषेत बोलतात? म्हणजे गोव्यातील भूत, महाराष्ट्रातील भूत, कर्नाटकचे भूत किंवा इतर विदेशी भूत आणि तेही वेगवेगळ्या काळातली. जर एखादं भूत १६ व्या शतकातलं असेल, तर ते आजच्या भाषेत कसं बोलतं? एखादा ब्रिटिश अधिकारी पुण्यात भूत म्हणून वावरत असेल, तर तो शुद्ध मराठी कशी काय बोलू लागतो? आणि गोव्यातल्या भुतांमध्ये तेव्हा सुद्धा कोंकणी-मराठी युद्ध चालू होतं का? माझी एक विद्यार्थिनी मला विचारायची, "सर तुम्ही भुतांना बघितलंय का? कधी भेट झालीय का? त्यांना व्याकरण कोण शिकवतं?" भुतांच्या जगात बहुधा एखादा 'एम.ए. लिंग्विस्टिक्स' कोर्स असावा जो कधीकाळी सुरू करण्याचा विचार केलेला असावा व ती भूतं आता तो कोर्स चालवतात. कोर्सच्या सुरुवातीच्या आठवड्यात नवीन प्रवेश घेतलेल्या भुतांना ‘पृथ्वीवरील माणसांना घाबरवण्याचे १०१ संवाद’ शिकवले जात असावेत.

हायवेवरच्या ज्या वळणावर जास्त अपघात होतात, तिथे लगेच कुणाचा भूतरूपी पुतळा उभा केला जातो. खरे म्हणजे रस्ता चुकीचा बांधलेला असतो किंवा लोकांचा वेग जास्त असतो. पण रस्ते विभागाला दोष देण्यापेक्षा एखाद्या भुताला दोष देणं सोपं असतं. भुताने ओढलं म्हटलं की आर.टी.ओ. आणि इंजिनिअर्स मोकळे! भुतं सुद्धा विचार करत असतील, “आम्ही काय रिकामे आहोत का, दिवसभर ऊन-पावसात रस्त्यावर उभं राहून गाड्या ओढायला?” गोव्यात एका पुलावर वारंवार खड्डे पडत होते. कितीही वेळा बुजवले तरी परत तयार! तसेही गोव्यातील सर्व रस्त्यांवर कदाचित भुतं असावीत, जी डांबर घातल्यानंतर रोज रात्री हळूहळू काढून आपल्या भूतविश्वात नेत असणार. त्यांना आपल्या विश्वात चांगला रस्ता नको की काय? आपले रस्ते ही त्यांची 'रॉ मटेरियल'ची खाण असावी! यात अभियंत्यांचा काहीच दोष नाही, भुतं रोज रात्री सक्रियपणे अभियंत्या पेक्षा जास्त गतीने आपले काम करतात ना!

शापित जागेवर रात्री कुणीतरी रडल्याचे किंवा किंचाळल्याचे आवाज येतात, असा दावा केला जातो. कधीकधी हे आवाज म्हणजे केवळ बिबट्याची डरकाळी, मांजरांची भांडणं किंवा वाऱ्याचा वेग असू शकतो. पण आपल्याला त्यात गूढ शोधायची सवय आहे. जर रात्री भूत खरंच रडत असेल, तर त्याला कोणी विचारलंय का, "भावा, काय झालं? कुठे पडून मार लागलाय की जॅट लॅगमुळे झोपमोड झालीय?"

जर एखादं घर १०-१५ वर्षं बंद असेल, तर त्या घराला 'शापित' जाहीर करण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागत नाहीत. कोळी आणि धूळ अशा घरांचे मुख्य 'इंटिरिअर डिझायनर' असतात. कोळींनी छतापासून कोपऱ्यापर्यंत विणलेली जाळी म्हणजे भुतांसाठी जणू 'डिझायनर पडदे'च! त्यात भर म्हणून वर्षांनुवर्षांची धूळ. जर तुम्ही त्या धुळीवर बोटाने तुमचं नाव लिहिलं, तर एखादं जुनं भूत येऊन "स्पेलिंग चुकलंय" म्हणून तुमची चूकही सुधारू शकतं. अशा घरांच्या बाहेर ‘ब्रँड अॅम्बेसेडर’ म्हणून हमखास एक काळी मांजर बसलेली असते. खरं तर बिचारी मांजर फक्त उंदराच्या शोधात असते, पण आपल्याला ती 'यमराजाची पाळीव प्राणी' वाटते.अशा घरात एक जुना गंजलेला पंखा, एखादी तुटलेली खुर्ची आणि काही भांडी असतात. वाऱ्याने जेव्हा गंजलेलं दार 'कर्कश' आवाज करतं, तेव्हा आपल्याला वाटतं कोणीतरी किंचाळलं. पण दारात तेल टाकण्याऐवजी आपण भुताच्या शांतीचा मुहूर्त बघतो. अशा घरांच्या बाबतीत एक ठरलेली 'स्क्रिप्ट' असते. गल्लीतला एखादा रिकामटेकडा माणूस 'दोन भावांच्या युद्धाची' रेडीमेड कहाणी रंगवून सांगतो: "अहो, या घरात दोन भाऊ राहायचे. संपत्तीवरून दोघांत युद्ध झालं. थोरल्याने धाकट्याचा गळा दाबला आणि धाकट्याने थोरल्याच्या पोटात सुरा खुपसला! दोघेही तडफडून मेले आणि आता त्यांचे आत्मे आजही याच्या मालकी हक्कावर झगडतात”. पण बहुतेक वेळा त्या घराचे मालक कोर्टाच्या केसमध्ये अडकलेले असतात किंवा परदेशात स्थायिक झालेले असतात. पण 'मालक अमेरिकेत आहे' यापेक्षा 'मालक मेला आणि भूत झाला' हे ऐकायला जास्त मनोरंजक वाटतं.

भारतातील या सर्व शापित जागा म्हणजे प्रत्यक्षात आपल्या मनातील भीतीचे आणि कल्पनाशक्तीचे बाजार आहेत. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर, भुतं ही माणसाच्या मेंदूतील 'हॅल्यूसिनेशन' आहेत, पण मनोरंजनाच्या भाषेत ती टी.आर.पी. देणारी साधनं आहेत. पुढच्या वेळी जर तुम्हाला पांढरी साडी दिसली, तर घाबरण्याऐवजी तिला विचारा, "ताई, साडी कुठून घेतली? आणि धुवायला कोणता साबण वापरता?" विश्वास ठेवा, भीती पळून जाईल! पण चुकून सुद्धा हे म्हणू नका की "माझ्या घरचे भूत विचारतेय," नाहीतर दुसऱ्या रात्री तुमचेच भूत तिथे नाईट ड्युटी करताना दिसेल!


- आदित्य सिनाय भांगी,

पणजी