लेक आणि लग्नाचे करे: सासर-माहेरच्या नात्याचा हळवा प्रवास

एका घराच्या कानाकोपऱ्यात आठवणी विणणारी लेक जेव्हा सासरी निघते, तेव्हा केवळ घरच नाही तर संपूर्ण गाव हळवे होते. गोव्याच्या लोकसंस्कृतीतील 'करे' आणि 'साडा' या विधींतील भावविश्व उलगडणारा हा लेख.

Story: भरजरी |
27th December, 11:32 pm
लेक आणि  लग्नाचे करे:  सासर-माहेरच्या नात्याचा हळवा प्रवास

लेक एका घरी जन्मते, पायांत पैंजण बांधून घरभर नाचते, घरातल्या प्रत्येक माणसाला जीव लावते आणि घराच्या कानाकोपऱ्यात आठवणी तयार करते. तुळशीच्या प्रत्येक उंचवट्यावर तिच्या रांगोळीचे छाप उमटलेले असतात. परसातल्या प्रत्येक झाडावेलीवर तिचा हात फिरलेला असतो. शेवग्यावरच्या पानवेलीला आणि परसदारच्या मोगरीला तिच्या स्पर्शाची सवय झालेली असते; किंबहुना संपूर्ण घरालाच तिची सवय झालेली असते. अशी आपली सवय लावून एक दिवस लेक अचानक आपले घर सोडून परघरी जाऊ लागते. हा क्षण घरातील प्रत्येकासाठी अत्यंत हळवा असतो.

परघरी जातानाची तिची तयारी सुरू होते ती लग्नाचे 'करे' भरताना. भारतीय संस्कृतीतील लग्नसोहळ्याला अठरापगड जातीचा हातभार लागलेला असतो. समाजव्यवस्थेतील प्रत्येक घटकाने दिलेली कोणती ना कोणती वस्तू लग्नकार्यासाठी आवश्यक असते. या वस्तू म्हणजे त्या-त्या समाजाने आपल्या माध्यमातून दिलेले आशीर्वादच असतात. यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंभाराकडून आणलेले 'करे'. मातीपासून तयार केलेले हे छोटे पाच किंवा सात करे सुंदर रंगांनी रंगवलेले असतात. त्या कऱ्यांमध्ये तीळ, तांदूळ, पाच प्रकारची कडधान्ये, पैसे आणि विडा-सुपारी अशी समृद्धीची रूपके घातलेली असतात. त्यानंतर हे करे पाण्याने भरून लग्न मंडपात आणून त्यांची पूजा केली जाते. यात सगळ्यात मोठा आणि मानाचा करा करवलीच्या हातात असतो, जो संपूर्ण लग्नविधी होईपर्यंत ती साभाळते.

करे भरणे ही सुद्धा एक आनंददायी आणि समाजभिमुख कृती आहे. पाच किंवा सात करे घेऊन सवाष्णी सर्वप्रथम गावच्या 'गावकऱ्याच्या'घरी जातात. गावकार म्हणजे त्या गावातील सर्व देवस्थानांचे अधिपत्य असलेली अतिशय महत्त्वाची व्यक्ती. गावातील मंदिराची पूजा आणि इतर धार्मिक कार्ये त्यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत. अशा या गावकाराच्या घरी जाऊन सवाष्णी त्यांच्या पत्नीला म्हणजेच 'गावकारणीला' विनंती करतात की त्यांनी लग्नाचे करे भरावे. ही विनंती करताना घरणी बाई गाऊ लागते:

फुल फुल रे पाणसुड्या चिताळ्या आंब्या

करे घेवन चालल्या देवाच्या देवरंभा

करे घेवन गेले गे गावकाराच्या दारा

गावकरनी गे बाये, आमच्या करयाचो भौमान करा गे...

आपल्या कऱ्याचा बहुमान करा, अशी विनंती करत असताना गावकरीण विचारते की, "तुमच्या कऱ्याचा कसला बहुमान?" तेव्हा सौभाग्याचे प्रतीक असलेले काजळ-कुंकू आणि समृद्धीचे प्रतीक असलेले तीळ-तांदूळ म्हणजे आमच्या कऱ्याचा बहुमान होय, असे उत्तर दिले जाते. मग गावकरीण नारळ फोडून त्या सर्व कऱ्यांमध्ये नारळाचे पाणी थोडे-थोडे टाकते. त्यानंतर सर्व सवाष्णी नदीकाठी किंवा विहिरीवर जातात. तिथे गावकरीण स्वतःच्या हाताने कऱ्यांमध्ये पाणी भरते. या भरलेल्या कऱ्यांची काजळ-कुंकू लावून पूजा केली जाते. भरलेले करे घेऊन देवाच्या अप्सरांसारख्या शोभणाऱ्या 'देवरंभा' (सवाष्णी) माटवात परततात. लग्नाचे करे भरले की शुभकार्याला खऱ्या अर्थाने सुरुवात होते.

हळदीच्या रात्री नवरी मुलीच्या घरी वरपक्षाकडून 'साडा' येतो. साडा म्हणजे नवरीसाठी नऊवारी कापड, दागिना, हळद-कुंकू, तांदूळ, विडा आणि पाच नारळ अशी परिपूर्ण ओटी असते. ही ओटी घेऊन येण्याचा मान फक्त नवरदेवाच्या भावाचा म्हणजेच 'दिराचा' असतो. इथेच नवरीचा आपल्या सासरच्या व्यक्तीशी, म्हणजे दिराशी पहिला संपर्क येतो. त्यांच्यात बहिणी-भावासारखे पवित्र नाते तयार व्हावे, अशी सुंदर तजवीज आपल्या रीतीरिवाजांत केलेली असते.

खरे तर वरमाळा गळ्यात पडल्यावर ती दुसऱ्याची होणार असते, पण हळदीच्या रात्री जेव्हा ती साडा नेसू लागते, तेव्हाच माहेरच्या प्रत्येकाला आपला हुंदका आवरणे कठीण होते. ओटीत आलेली नऊवारी साडी नवरीला नेसवली जाते. पूर्वी साडी नेसवल्यानंतर तिच्या कपाळावर गंध लावून त्यावर डाळ आणि तांदळापासून नक्षी काढली जात असे. अशी सजलेली नवरी पाहून घरणी बाई गाऊ लागते:

साळी डाळींच्या तांदळावरी, व्हकाल बाळे उभी केली

परायाची गे साडी, लेक लेऊ लागली

परायाची गे साडी, गोरये आवडीन लेयशी

आई बाप्पाचो गे लोभ, गोरये इसारशी...

"तू आता परक्याची साडी आवडीने नेसतेस, पण तुझ्या आई-वडिलांनी तुझ्यावर केलेली माया आणि लोभ मात्र विसरू नकोस," असा संदेश या गाण्यातून दिला जातो. या ओळींमध्ये नवरीसह जमलेल्या सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला नाही तरच नवल!

साडी नेसून झाल्यावर साडा घेऊन आलेल्या भावासमोर नवरीला बसवले जाते. त्यानंतर दोघांनाही 'शेस' भरली जाते. पहिला मान गावकार-गावकारणीचा असतो, त्यानंतर आई-वडील, नातेवाईक आणि इतर लोक लेकीला आशीर्वाद देतात. नवऱ्याच्या भावाला आपल्या या नवीन बहिणीची काळजी घेण्याची विनंती केली जाते.

हा साडा नेसवण्याचा क्षण संपूर्ण सोहळ्यातील अतिशय भावूक क्षण असतो. याच वेळी माहेरच्यांना जाणीव होते की, आपली लेक आता परकी झाली आहे; आणि नवरीला जाणीव होते की, आतापर्यंतचे आपले हक्काचे घर आता 'माहेर' झाले आहे. तर नवरीच्या मागे खंबीरपणे बसलेल्या दिराला जाणीव होते की, ही मुलगी आता आपल्या घराची जबाबदारी असून तिची भावाप्रमाणे काळजी घेणे आपले कर्तव्य आहे.

आपली लग्न संस्कृती ही केवळ एका सहीने पूर्ण होणारी प्रक्रिया नसून, ती एका उमलणाऱ्या कमळासारखी आहे. यातील प्रत्येक विधी म्हणजे त्या कमळाची एक-एक पाकळी आहे, जी हळूहळू उमलत संपूर्ण आयुष्याला सुगंधित करते.


- गाैतमी चाेर्लेकर गावस