भुटेभाट-वास्को येथे चोर म्हणून पकडलेल्या युवकाचा मृत्यू

बांबोळीच्या आयपीएचबीमध्ये सुरू हाेते उपचार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
28th December, 11:22 pm
भुटेभाट-वास्को येथे चोर म्हणून पकडलेल्या युवकाचा मृत्यू

वास्को : भुटेभाट येथे चोर समजून स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलेल्या देबानंद साना (३४, कोलकाता) याचा बांबोळी येथील इस्पितळात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलीस तपासात तो मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचे निष्पन्न झाले होते. याप्रकरणी वास्को पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे.

चोरीच्या संशयावरून स्थानिकांनी पकडले

मंगळवार, दिनांक २३ डिसेंबर रोजी भुटेभाट येथील रहिवाशांनी साना याला एका बंद असलेल्या घरातून शिडी घेऊन बाहेर येत असताना पकडले. बंद असणाऱ्या घरांना लक्ष्य करणारा चोर असल्याचा संशय आल्याने स्थानिकांनी त्याला ताब्यात घेतले आणि वास्को पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याच्यासोबत इतर चार जण होते आणि ते चोरीचा माल घेऊन पळून गेले, असा दावा त्यावेळी काही रहिवाशांनी केला होता.

मानसिक स्थिती ठीक नसल्याचे स्पष्ट

मात्र, वास्को पोलिसांनी चौकशीअंती स्थानिकांचा हा दावा फेटाळून लावला. तपासानंतर पोलिसांनी स्पष्ट केले की, साना हा एका कंत्राटदाराकडे कामाला होता आणि त्याची मानसिक स्थिती ठीक नव्हती. त्यामुळे त्याला वैद्यकीय उपचारासाठी बांबोळी येथील ‘इन्स्टिट्यूट ऑफ सायकियाट्री अँड ह्युमन बिहेवियर’मध्ये (आयपीएचबी) दाखल केले होते.

उपचारादरम्यान जीएमसीमध्ये मृत्यू

दिनांक २७ डिसेंबर रोजी दुपारी १२.२८ वाजण्याच्या सुमारास वास्को पोलिसांना जीएमसी बांबोळी येथील कॅज्युअल्टी पोलिसांकडून साना याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. त्याला आयपीएचबीमधून जीएमसीमध्ये पाठवण्यात आले होते, तिथेच त्याचा अंत झाला. पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील सोपस्कारांसाठी मृतदेह जीएमसीमध्ये ठेवला आहे. वास्को पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १९६ अंतर्गत अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली. पुढील तपास पीएसआय प्लेटो कार्व्हालो करत आहेत.

#VascoNews #GoaPolice #MistakenIdentity #UnnaturalDeath #MentalHealth
हेही वाचा