वारखंडेत जमावाने जेसीबी जाळला मुलासह तिघे गंभीर जखमी

पणजी : येथील वारखंड-फोंडा जंक्शनवर रविवारी डंपर ट्रकने दिलेल्या भीषण धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत महिलेचे पती आणि अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी इस्पितळात दाखल केले. दरम्यान वेर्णा येथील आग्नेल आश्रमजवळ आणि कुठ्ठाळी परिसरात झालेल्या आणखी एका अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात सायंकाळी ६.३० वाजता घडला. एका बसला दुचाकीची धडक बसताच दुचाकीने पेट घेतला. यात दुचाकीवरील युवक भाजल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पती, पत्नी आणि त्यांचा मुलगा प्रवास करत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. भरधाव डंपरने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, महिलेचा घटनास्थळीच प्राण गेला. तर पती आणि मुलगा गंभीररीत्या जखमी झाले. स्थानिकांनी तत्परता दाखवत दोघांनाही तातडीने रुग्णालयात हलवले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या अपघातानंतर स्थानिकांचा संयम सुटला आणि त्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त केला. अपघातस्थळापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर पोलीस चौकी आहे, तरीही पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यास विलंब झाला, असा आरोप स्थानिकांनी केला. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये आधीच संताप होता, त्यात पोलिसांच्या विलंबाने भर पडली. पोलिसांच्या निषेधार्थ आणि वाढत्या अपघातांच्या विरोधात स्थानिक नागरिकांनी जंक्शनवरून जाणारी डंपर वाहतूक रोखून धरली.
अपघातानंतर पोलिसांच्या विलंबाने पोहचण्यामुळे आणि नियोजनाच्या अभावामुळे जमाव हिंसक झाला. संतप्त जमावाने डंपर वाहतूक रोखून धरली आणि अपघातस्थळी असलेल्या एका जेसीबीला आग लावली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते आणि वाहतूक ठप्प झाली. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून जमावाला पांगवले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
दुसरी घटना कुठ्ठाळीच्या उड्डाणपुलावर रविवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडली. विनोद बजाज आणि शाहील कुमार पिन्जानी (रा. मध्य प्रदेश) हे दोघे दुचाकीने पणजीहून मडगावकडे निघाले होते. पुलावर पोहोचले असता चालक विनोदचा ताबा सुटल्याने दुचाकी रस्ता दुभाजकावर आदळली. या स्वयंअपघातात मागे बसलेला शाहील कुमार पिन्जानी हा गंभीर जखमी झाला. या अपघातात दुचाकी जळून खाक झाली.