गोवा : १५ जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई

कृषी संचालक : जिल्हा पंचायत निवडणुकीमुळे रेंगाळली प्रक्रिया

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
29th December, 11:52 pm
गोवा : १५ जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई

पणजी : अवकाळी पावसामुळे (unseasonal rain) नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना (farmers of Goa) १५ जानेवारीपर्यंत नुकसान भरपाई (compensation) मिळणार आहे. कृषी कार्डधारक शेतकऱ्यांना ही भरपाई मिळण्यास सुरुवात झाली आहे. मात्र ज्यांच्याकडे कृषी कार्ड नव्हते, त्यांना नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया जिल्हा पंचायत निवडणुकीमुळे रेंगाळली होती, अशी माहिती कृषी संचालक संदीप फळदेसाई यांनी दिली आहे.

ऑक्टोबर महिन्यात भात पीक कापणीला आले असतानाच अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता. या पावसामुळे तयार झालेले पीक भुईसपाट झाले आणि पाण्यात भात कुजल्यामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले. या घटनेनंतर कृषी खात्याने तातडीने पिकांचे सर्वेक्षण करून आढावा घेण्यास सुरुवात केली होती. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सर्व शेतकऱ्यांना १९ डिसेंबरपूर्वी नुकसान भरपाई देण्याचे आश्वासनही दिले होते.
मात्र १९ डिसेंबर उलटून आता नवीन वर्ष जवळ आले आहे, तरीही राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या पदरात ही नुकसान भरपाई पडलेली नाही. विभागीय कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन चौकशी केली असता, अजूनही नुकसान भरपाईचे पैसे जमा झाले नसल्याचे उत्तर अधिकारी देत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.
याबाबत कृषी खात्याचे संचालक संदीप फळदेसाई यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया कृषी खात्याने सुरू केली असून १५ जानेवारीपर्यंत सर्व शेतकऱ्यांना भरपाई मिळेल.

जिल्हा पंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे यासंदर्भातील प्रक्रिया संथ गतीने झाली, त्यामुळे भरपाई देण्यास खात्याला विलंब झाला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे कृषी कार्ड आहे, त्यांना ही नुकसान भरपाई थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांकडे कृषी कार्ड नाही, त्यांना भरपाई देण्यासाठी सरकारी मान्यतेची आवश्यकता असते, अशी माहिती फळदेसाई यांनी दिली.

४० टक्के कृषी कार्ड धारकांना मिळाली भरपाई
ज्या शेतकऱ्यांकडे कृषी कार्ड नाही, त्यांच्या नुकसान भरपाईसाठी सरकारी मान्यता मिळवून देण्याचे काम आम्ही सुरू केले आहे. तसेच, कृषी कार्ड धारक शेतकऱ्यांपैकी ३० ते ४० टक्के शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली आहे, असेही कृषी खात्याचे संचालक संदीप फळदेसाई यांनी स्पष्ट केले.      

हेही वाचा