अहवालातील निष्कर्ष, शिफारशींबाबत निर्णय होण्याची शक्यता

पणजी : ‘बर्च बाय रोमिओ लेन’ (Birch by Romio Lane) क्लब दुर्घटनाप्रकरणी दंडाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालावर मुख्यमंत्री मंगळवारी उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. अहवालातील निष्कर्ष आणि शिफारशींबाबत अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Goa CM Dr. Pramod Sawant) यांनी दिली.
‘बर्च बाय रोमिओ लेन’ क्लबला ६ डिसेंबरच्या रात्री आग लागली होती. या आगीत कर्मचारी आणि पर्यटकांसह २५ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर ८ डिसेंबर रोजी सरकारने दंडाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती स्थापन केली होती. उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अंकित यादव या चौकशी समितीचे अध्यक्ष होते. दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक टिकमसिंग वर्मा, फॉरेन्सिक सायन्स खात्याचे संचालक आशुतोष आपटे आणि अग्निशमन दलाचे उपसंचालक राजेंद्र हळदणकर हे या समितीचे अन्य सदस्य होते.
समितीने मंगळवार २३ डिसेंबर रोजी सरकारला अहवाल सादर केला. या अहवालात पंचायत संचालनालयासह इतर खाती तसेच अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढण्यात आले आहेत. या अहवालावर सरकार काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अहवालावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अद्याप भाष्य केलेले नाही.
चौकशी समितीच्या अहवालात प्रत्येक खात्यांसाठी वेगवेगळ्या शिफारशी आहेत. त्यामुळे प्रथम मी अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन चर्चा करणार असून अहवाल पूर्णपणे समजून घेतल्यावरच त्यावर भाष्य करणार आहे.
- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री