मुख्यमंत्र्यांना विश्वास : भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष लवकरच येणार गोवा दौऱ्यावर

पणजी : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष नितीन नवीन (BJP working president Nitin Nabin) हे फेब्रुवारी महिन्यात संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यासाठी गोवा दौऱ्यावर येणार आहेत. नवे अध्यक्ष सर्व राज्यांचा दौरा करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. नवीन यांची वाटचाल आणि अनुभव पक्ष आणि देश मजबूत करण्यासाठी पूरक ठरेल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) यांनी म्हटले आहे. नवी दिल्लीत नितीन नवीन यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले.
मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी नवी दिल्लीत नितीन नवीन यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. नवीन हे कार्याध्यक्ष झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच त्यांची भेट घेतली. यावेळी माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर, माजी खासदार ॲड. नरेंद्र सावईकर आणि सर्वानंद भगत उपस्थित होते.
नितीन नवीन यांच्याशी संघटनात्मक कार्याबाबत चर्चा झाली. ते संपूर्ण देशाचा दौरा करणार आहेत. फेब्रुवारी महिन्यात ते गोव्यात येऊन संघटनात्मक कार्याची माहिती घेतील, असे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी सांगितले.
मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि प्रदेशाध्यक्ष दामू नाईक हे दिल्लीत कामाच्या निमित्ताने इतर नेत्यांच्या भेटी घेतील. इतर सर्व जण नितीन नवीन यांची भेट घेऊन सायंकाळी गोव्यात परतले, अशी माहिती सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी दिली.