गोव्यात ११ महिन्यांत २२९ प्राणघातक अपघात : २३८ जणांचा मृत्यू; पादचाऱ्यांच्या मृत्यूत वाढ

Story: उमेश झर्मेकर । गोवन वार्ता |
29th December, 11:47 pm
गोव्यात ११ महिन्यांत २२९ प्राणघातक अपघात : २३८ जणांचा मृत्यू; पादचाऱ्यांच्या मृत्यूत वाढ

म्हापसा : गोव्यात यंदा जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांच्या कालावधीत २२९ प्राणघातक अपघात घडले. त्यामध्ये एकूण २३८ वाहनस्वारांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत प्राणघातक अपघात आणि मृत्यूचे प्रमाणे कमी असल्याचे दिसून येते, २०२५ मध्ये २५८ लोकांचा अपघाती मृत्यू झाला होता. मात्र पादचाऱ्याच्या अपघाती मृत्यूची टक्केवारी ही ४० टक्के जास्त आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यात गेल्या अकरा महिन्यांमध्ये २१२० अपघात नोंद झाले. त्यामध्ये २२९ जीवघेणे अपघात होते. २०६ अपघातात वाहनस्वार किंवा अन्य गंभीर जखमी झाले. तर ३८७ अपघातात चालक किंवा अन्य किरकोळ जखमी झाले. इतर १२९८ अपघातांचा समावेश आहे. ज्यामध्ये कुणालाही दुखापत झाली नाही.
प्राणघातक अपघातांमध्ये २३८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये १६७ दुचाकीस्वारांचा समावेश आहे. यात १३९ दुचाकीस्वार चालक तर दुचाकीच्या मागे बसलेल्या २८ जणांचा समावेश आहे. शिवाय इतर ८ वाहन चालक, ५३ पादचारी, एक सायकलस्वार आणि इतर तिघांचा अपघाती मृत्यू झाला आहे.
गेल्या वर्षी ३८ पादचाऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला होता. तर यंदा ही संख्या ५३ आहे. तसेच वरील अपघातांमध्ये यंदा २५७ वाहनस्वारांना गंभीर दुखापत झाली असून ६९१ जणांना किरकोळ दुखापत झाली आहे.
नियम मोडणाऱ्यांकडून १४ कोटी दंड वसूल
चालू वर्षी नोव्हेंबरपर्यंत मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या १ लाख ९६ हजार ४३७ वाहनस्वारांवर पोलिसांनी कारवाई केली. या उल्लंघनकर्त्या वाहनस्वारांकडून १४ कोटी ५९ लाख २९ हजार ६०० रूपये दंडात्मक रक्कम वसूल केली. तर गेल्यावर्षी ३.८० वाहनस्वारांकडून २३.१७ कोटी रूपये दंडात्मक रक्कम वसूल केली होती.
वाहतूक पोलिसांवर निर्बंधांचा दंडवसुलीवर परिणाम
यंदा वाहन वाहतूक नियमाच्या नावाखाली पर्यटकांना लुबाडण्याचे प्रकार जास्त प्रमाणात उघडकीस आले होते. काही आयपीएस अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांसोबत देखील पोलिसांकडून गैरव्यवहार घडला होता. याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी वाहतूक पोलिसांवर निर्बंध घातले होते, याचा परिणाम साहजिकच दंड वसुलीवर पडला आहे.