रेबीजने म्हैस मेली; तेराव्याला जेवलेल्यांची तारांबळ : रेबीजच्या भीतीने २०० लोक हॉस्पिटलात

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
रेबीजने म्हैस मेली; तेराव्याला जेवलेल्यांची तारांबळ : रेबीजच्या भीतीने २०० लोक हॉस्पिटलात

लखनऊ : रेबीज (Rabies) झालेल्या कुत्र्याने (Dog) चावा घेतल्याने म्हैस (Buffalo) गेली. या म्हशीच्या दुधापासून (Milk) बनवलेला पदार्थ तेराव्याच्या जेवणावळीत खाल्ल्यानंतर रेबीजच्या भीतीने अख्खा गाव म्हणजे २०० लोक हॉस्पिटलात रेबीजची चाचणी करण्यासाठी दाखल झाले. या घटनेची चर्चा सर्वत्र सुरू आहे. 

उत्तर प्रदेश येथील बदायू जिल्ह्यातील पिपरौल गावात ही घटना घडली. काही दिवसांपूर्वी एका पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्यानंतर म्हैस रेबीजग्रस्त बनली. या म्हशीच्या दुधापासून बनवलेला पदार्थ तेराव्याच्या जेवणावळीत ग्रामस्थांनी खाल्ला. त्यानंतर म्हैस गेल्याची माहिती ग्रामस्थांना समजल्यावर घाबरले. आणि तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन २०० हून अधिक लोकांनी रेबीज प्रतिबंधक लस टोचून घेत खबरदारी घेतली. 

एका तेराव्यानिमित्त २३ डिसेंबर रोजी जेवणावळीचे आयोजन करण्यात आले होते. म्हशीचा दुधापासून बनवलेला रायता लोकांना वाढण्यात आला. मात्र, ज्या म्हशीच्या दुधापासून रायता बनवला होता तिला २६ डिसेंबरमध्ये रेबीजची लक्षणे दिसू लागली. त्यानंतर म्हैस मृत्यू पावली. त्यानंतर आख्खा गाव प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन त्यांनी रेबीज प्रतिबंधक लस टोचून घेतली. 

दरम्यान, आरोग्य विभागाला यासंदर्भात माहिती मिळताच पथकाने गावात जाऊन एकूण परिस्थिती पाहिली. यासंदर्भात माहिती देताना मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रामेश्र्वर मिश्रा यांनी सांगितले की, ग्रामस्थांना खबरदारीचा उपाय म्हणून रेबीज प्रतिबंधक लस घेण्यास सांगितले. रोग होईपर्यंत वाट पाहण्यापेक्षा प्रतिबंधात्मक खबरदारी घेणे चांगले. उकळून घेतलेले दूध प्यायल्यास रेबीज होणे कठीण असते. मात्र, तरीही धोका वाटत असल्यास लस घेणे घेणे योग्य ठरते. सध्या तरी कुणालाही बाधा झाली नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. 

हेही वाचा