हृदयविकाराच्या झटक्याचा बनाव पोलिसांनी झटक्यात हाणून पाडला; कळंबोलीत माणुसकीला काळीमा!

नवी मुंबई : नवी मुंबईच्या कळंबोली उपनगरात एक अशी खळबळजनक घटना उघडकीस आली आहे, ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. ज्या आईच्या कुशीत बाळ स्वतःला सर्वात सुरक्षित समजते, त्याच जन्मदात्या मातेने आपल्या ६ वर्षांच्या निष्पाप चिमुरडीची निर्घृण हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे, मुलगी मराठी ऐवजी हिंदीत बोलते आणि तिला बोलण्यात अडथळा येतो, या अत्यंत क्षुल्लक आणि विचित्र कारणावरून या उच्चशिक्षित आईने हे टोकाचे पाऊल उचलले.
कळंबोलीतील सेक्टर १ मधील गुरूसंकल्प हाऊसिंग सोसायटीत राहणाऱ्या या कुटुंबात एक आयटी अभियंता पती आणि बीएसस्सी पदवीधर पत्नी राहत होते. वरवर सुखी वाटणाऱ्या या कुटुंबात एक भयानक कट शिजत होता. २३ डिसेंबरच्या त्या काळरात्री, या निर्दयी मातेने आपल्या पोटच्या मुलीचा श्वास रोखून तिला संपवण्याचा निर्णय घेतला. जेव्हा सायंकाळी पती घरी परतला, तेव्हा मुलगी अचेत पडलेली दिसली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी आईने आपल्या मुलीला 'हृदयविकाराचा झटका' आल्याचा बनाव रचला.

मात्र, कळंबोली पोलीस पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांच्या तीक्ष्ण नजरेतून या मृत्यूमागचे गूढ सुटू शकले नाही. ६ वर्षांच्या मुलीला हृदयविकाराचा झटका येणे ही बाब त्यांना संशयास्पद वाटली. त्यांनी तातडीने मुलीचे शवविच्छेदन करण्याची विशेष विनंती केली. वैद्यकीय अहवालात मुलीचा मृत्यू नैसर्गिक नसून तिचा श्वसनमार्ग दाबल्यामुळे (गुदमरून) झाल्याचे स्पष्ट संकेत मिळाले. या तांत्रिक पुराव्यानंतर पोलिसांनी जेव्हा आई-वडिलांना पोलीस स्थानकात नेऊन कसून चौकशी सुरू केली, तेव्हा एका गुन्हेगारी पटकथेप्रमाणे यातील सत्य बाहेर येऊ लागले.

सलग सहा तासांच्या उलटतपासणीनंतर, त्या मातेचा संयम सुटला आणि तिने आपल्या क्रूर कृत्याची कबुली दिली. तपासात समोर आले की, २०१७ मध्ये लग्न झालेल्या या महिलेला मुलगा हवा होता. २०१९ मध्ये मुलगी जन्माला आल्यापासून ती नाराज होती. त्यातच मुलीला बोलताना होणारा त्रास आणि ती मराठी शब्दांऐवजी हिंदी शब्दांचा वापर करणे, या गोष्टींचा त्या आईला प्रचंड राग येत असे. "मला अशी मुलगी नको," असे ती पतीला वारंवार सांगत असे. या महिलेवर मनोविकार तज्ज्ञांचे उपचार सुरू असल्याची माहितीही आता समोर आली आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या कृत्याबद्दल कळंबोली पोलिसांनी या ३० वर्षीय महिलेला अटक केली असून, एका निष्पाप जीवाचा तिच्याच आईने अंत केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.