ज्या कंपनीची पायरीही कधी चढली नाही, तिथूनच आले 'टर्मिनेशन लेटर'!

भलत्याच कंपनीच्या ईमेलने वाढवली महिलेची धाकधूक!

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
50 mins ago
ज्या कंपनीची पायरीही कधी चढली नाही, तिथूनच आले 'टर्मिनेशन लेटर'!

नवी मुंबई : सध्याच्या काळात नोकरी टिकवणे म्हणजे एक युद्धप्रसंग झाले आहे, पण विचार करा की तुम्ही घरी निवांत बसला आहात आणि अचानक तुमच्या ईमेलवर एक 'टर्मिनेशन लेटर' धडकते! नवी मुंबईतील एका महिलेसोबत नुकताच असाच काहीसा हृदयाचे तुकडे पाडणारा पण तितकाच हास्यास्पद प्रकार घडला. २५ डिसेंबर २०२५ रोजी या महिलेला आपल्या नोकरीवरून काढले गेल्याचा ईमेल आला आणि क्षणभर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. ईमेल वाचल्यानंतर काही सेकंद तर ती पुतळ्यासारखी गोठूनच गेली. आपल्याकडून कोणती डेडलाइन चुकली? कामात काही मोठी चूक झाली का? की ऑफिसमध्ये कोणाशी तरी चुकीचे बोलले-वागले ? अशा हजारो शंकांनी तिच्या मनात काहूर माजवले.



मात्र, खरा ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा या धक्क्यातून सावरत तिने आणि तिच्या पतीने तो ईमेल पुन्हा एकदा नीट वाचला. ईमेलमधील मजकूर 'नोकरीवरून काढले' असाच होता, पण गम्मत म्हणजे ज्या कंपनीने हे पत्र पाठवले होते, त्या कंपनीत या महिलेने कधी पाऊलही ठेवले नव्हते! म्हणजे ज्या कंपनीशी तिचा दुरान्वयेही संबंध नाही, त्याच कंपनीने चक्क तिला कामावरून काढून टाकल्याचे फर्मान सोडले होते. हा सर्व प्रकार म्हणजे एचआर विभागाच्या 'स्मार्ट' कारभाराचा एक नमुनाच ठरला. चुकीच्या ईमेल आयडीमुळे एका अनोळखी व्यक्तीचे धाबे दणाणले होते.


Distressed young woman cry reading bad news in letter. Unhappy female  depressed with negative message or dismissal notice. Vector illustration.  22136976 Vector Art at Vecteezy


तिचे पती सायमन इंगारी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर ही घटना शेअर केली आणि बघता बघता ही पोस्ट व्हायरल झाली. सायमन यांनी अत्यंत मिश्किल टिप्पणी करत त्या कंपनीच्या एचआर विभागाला आपला ईमेल डेटाबेस आणि चष्मा दोन्ही नीट तपासण्याचा उपरोधिक सल्ला दिला. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनीही या प्रकरणाची यथेच्छ मजा घेतली. एका युजरने तर उपरोधाने म्हटले की, पुढच्या वेळी ईमेल पाठवताना किमान अचूकता पाळा, कारण अशा धक्क्याने तब्येत बिघडली तर आरोग्य विमा ही गोष्ट कव्हर करत नाही! 


हेही वाचा