‘अटल’ जिल्ह्याचे मुख्यालय केपेत; मुख्यमंत्र्यांनी घेतली सर्वपक्षीय आमदारांची बैठक

पणजी : गोव्यात (Goa) तिसरा जिल्हा (Third District) स्थापन करण्यावर सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीत निर्णय झाला असून, याबाबतची अधिसूचना लवकरच जारी केली जाईल. धारबांदोडा (Darbandora), सांगे (Sanguem), केपे (Quepem) व काणकोण (Canacona) हे चार तालुके तिसऱ्या जिल्ह्यात असतील. तिसऱ्या जिल्ह्याचे मुख्यालय केपे येथे असेल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बैठकीनंतर दिली.
तिसऱ्या जिल्ह्याला अटल हे नाव दिले जाणार आहे. नाव उद्या जाहीर केले जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. तिसऱ्या जिल्ह्याला काँग्रेसचा विरोध नसला तरी त्याबाबत अभ्यास होणे आवश्यक आहे. तिसऱ्या जिल्ह्याच्या अभ्यासासाठी सरकारने समिती स्थापन केली होती. या समितीचा अहवाल सरकारने उघड करणे आवश्यक आहे. अहवाल उघड न करता घाईघाईत तिसरा जिल्हा करणे अयोग्य आहे, असे विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी बैठकीनंतर सांगितले. आरजीचे आमदार वीरेश बोरकर यांनी सुद्धा लोकांना विश्वासात घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.
तिसऱ्या जिल्ह्याच्या स्थापनेबाबत मंत्रिमंडळ तसेच विधानसभेत चर्चा झालेली आहे. निती आयोगाच्या शिफारसी प्रमाणे देशात लहान जिल्हे स्थापन केले जात आहेत. देशात १२० नवीन जिल्हे स्थापन झाले आहेत. गोव्यातील तिसरा जिल्हा हा यापैकीच एक आहे. तिसऱ्या जिल्ह्यामुळे अतिरिक्त निधी मिळण्यासह केंद्रीय योजनांचा अधिक प्रमाणात लाभ घेणे शक्य होणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.
धारबांदोडा, केपे, काणकोण, सांगेचा समावेश : मंत्री तवडकर
धारबांदोडा, केपे, काणकोण व सांगे या चार तालुक्यांचा तिसरा जिल्हा करण्यास सर्व आमदारांनी पाठिंबा दिला आहे. तिसरा जिल्हा या सर्व तालुक्यांना लाभदायक ठरणार असल्याचे कला व संस्कृतीमंत्री रमेश तवडकर यांनी सांगितले.
लोकांना लाभ होणार : सभापती गणेश गावकर
तिसऱ्या जिल्ह्यात सावर्डे, धारबांदोडा, केपे, कुडचडे, काणकोण व सांगे या मतदारसंघांचा समावेश होणार आहे. या मतदारसंघातील लोकांना याचा लाभ होईल. असे सभापती गणेश गावकर यांनी सांगितले.
विरोध नाही : युरी आलेमाव
तिसऱ्या जिल्ह्याला विरोध नसला तरी याचा अभ्यास व्हायला हवा. स्थापन केलेल्या समितीचा अहवाल उघड होण्यापूर्वीच निर्णय घेणे बरोबर नसल्याचे विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव म्हणाले.
अभ्यास व्हायला हवा : आमदार वीरेश
तिसऱ्या जिल्ह्याला विरोध नसला तरी त्याबाबत अभ्यास व्हायला हवा असल्याचे आरजी पक्षाचे आमदार वीरेश बोरकर यांनी सांगितले.