
पणजी : शेती (Agriculture), पर्यावरण (Envirnoment) सांभाळण्यासह गोवा वाचवण्यासाठी लोकचळवळ उभारण्याची नितांत आवश्यकता आहे. यासाठी निवृत्त न्यायाधीशांप्रमाणे काही बुद्धिजिवी लोक पुढाकार घेत असतील, तर ती चांगली बाब ठरेल, अशा शब्दात राज्यातील विरोधी पक्षांनी निवृत्त न्यायाधीश फेर्दिन रिबेलो (Retired High Court Judge Ferdino Rebello) यांच्या आवाहनाला पाठिंबा दिला आहे. लोकशाहीत सुशासन तसेच कायदा, सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी लोकचळवळीला पर्याय नसतो, असे गोवा फॉरवर्डचे (Goa Forward Party) आमदार विजय सरदेसाई यांनी म्हटले आहे.
काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, आप व आरजी अशा सर्व विरोधी पक्षांनी फेर्दिन रिबेलो यांच्या आवाहनाला पाठिंबा दिला आहे. गोव्यातील जमिनींची विक्री होऊ नये, डोंगर कापणी बंद होऊन बेकायदा बांधकामांवर कारवाई करणे व नोकऱ्या गोमंतकीयांना मिळाव्यात, ह्या आरजीच्या मागण्या आहेत. फेर्दिन रिबेलो यांनी एक प्रकारे आरजीच्या मागण्यांनाच पाठिंबा दिला आहे. काही दिवसांपूर्वी माझी त्यांच्या बरोबर या विषयावर चर्चाही झालेली आहे. त्यांच्या आवाहनाचा गोमंतकीयांनी गंभीरपणे विचार करायला हवा, असे आरजीचे आमदार विरेश बोरकर यांनी म्हटले आहे.
गोवा वाचवण्यासाठी लोकचळवळ व्हायलाच हवी. गोमंतकीयांना नोकऱ्यांत प्राधान्य, जमीन विक्री बंद करणे, पर्यावरण व शेतीचे संवर्धन या गोष्टी गोवा वाचवण्यासाठी आवश्यक आहेत. येत्या निवडणुकीत हाच मुख्य मुद्दा असेल, असे गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी म्हटले आहे. फेर्दिन रिबेलो यांचे आवाहन विचार करण्यायोग्य आहे. गोमंतकीयांनी याचा विचार करायला हवा, असे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमीत पाटकर यांनी म्हटले आहे.