काणकोणमध्ये नवव्या आदिवासी क्रीडा महोत्सवाचे आयोजन

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
22 mins ago
काणकोणमध्ये नवव्या आदिवासी क्रीडा महोत्सवाचे आयोजन

पणजी : (Goa) क्रीडा खाते (Sports Department), क्रीडा प्राधिकरण (Sports Authority) आणि आदर्श युवा संघातर्फे आदर्श ग्राम अमोणे, पैंगीण, काणकोण (Canacona) येथे ९ ते ११ जानेवारी दरम्यान ९ व्या आदिवासी क्रीडा महोत्सवाचे (Tribal Sports Festival) आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात राज्यभरातील १६०० हून अधिक खेळाडू सहभागी होणार असल्याची माहिती क्रीडा मंत्री रमेश तवडकर (Sports Minister Ramesh Tawadkar) यांनी दिली. मंगळवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अजय गावडे, विवेक पवार उपस्थित होते.

तवडकर यांनी सांगितले की, राज्यात क्रीडा संस्कृती वाढवणे, आदिवासी खेळाडूंना शोधून त्यांना संधी देण्यासाठी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. महोत्सवात टेनिस क्रिकेट, व्हॉलीबॉल, ॲथलेटिक्स यांच्यासह पारंपारिक क्रीडा प्रकारात स्पर्धा होतील. यामध्ये कबड्डी, खो खो, लगोरी, लंगडी, रस्सीखेच असे क्रीडा प्रकार असणार आहेत. स्पर्धेमध्ये १२ तालुक्यातील १६४८ खेळाडू तर २४० क्रीडा अधिकारी सहभागी होतील.

ते म्हणाले, या स्पर्धा महिला आणि पुरुष गटांमध्ये होतील. कबड्डी खो-खो, टेनिस क्रिकेट, व्हॉलीबॉल या स्पर्धांमध्ये प्रथम पारितोषिक २५ हजार, द्वितीय २० हजार तर तृतीय १५ हजार रुपये व चषक असे  असणार आहे. तालुकास्तरीय संघाची निवड २८ डिसेंबर रोजी प्रत्येक तालुक्यात घेतली जाणार आहे. याशिवाय महोत्सवा दरम्यान अखिल भारतीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात आले आहे. यामध्ये सुमारे १ हजार स्पर्धक सहभागी होतील. 

पारंपारिक खेळांना प्रोत्साहन 

तवडकर यांनी सांगितले की, राज्यातील पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा खाते प्रयत्न करत आहे. यातीलच एक भाग म्हणून लगोरी, विटी दांडू यांच्या संघटना तयार करण्यात आल्या आहेत. याशिवाय अन्य पारंपारिक क्रीडा प्रकारांच्या संघटना करण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा