आईचा सदोष मनुष्यवध; पुत्राला ६ वर्षांचा कारावास

उत्तर गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा निवाडा

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
47 mins ago
आईचा सदोष मनुष्यवध; पुत्राला ६ वर्षांचा कारावास

म्हापसा : गोव्यातील (Goa) मेरशी येथे २०१९ साली झालेल्या लक्ष्मीबाई वेर्लेकर (६९) हिच्या सदोष मनुष्यवध प्रकरणी तिचा पूत्र संदीप वेर्लेकर याला सहा वर्षे सहा महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा मेरशी येथील उत्तर गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचे (North Goa District Session Court) न्यायाधीश ईर्शाद आगा यांनी ठोठावली आहे.

 ही शिक्षा भा. न्या. संहितेच्या ३०४ (२) कलमाखाली न्यायालयाने दिली आहे. या प्रकरणी जुने गोवा पोलिसांनी १९ नोव्हेंबर, २०१९ रोजी गुन्हा दाखल केला होता. आरोपी संदीप वेर्लेकर हा १८ नोव्हेंबर, २०१९ सायंकाळी ८ च्या दरम्यान दारु पिऊन घरी आला. त्यानंतर त्याने आजारी असलेली आपली आई लक्ष्मीबाई हिला दारूच्या नशेत आणि रागाच्या भरात मारहाण केली. त्यावेळी इतर कुटुंबीयातील सदस्यांनी तिची आरोपीच्या तावडीतून सुटका केली होती. त्यानंतर रात्री ९ वाजता आरोपीने घरात झोपलेल्या आईला पुन्हा मारहाण केली आणि तिला ओढत घरच्या वरांड्यात आणले होते. तिने आरडाओरडा केल्यानंतर घरातील इतर सदस्य धावत बाहेर आले. त्यावेळी आरोपी तिथेच होता, नंतर तिला बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

  या प्रकरणी शवचिकित्सा अहवाल आल्यानंतर तत्कालीन पोलीस निरीक्षक कृष्णा सिनारी यांनी आरोपी संदीप वेर्लेकर याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली. तपास पूर्ण झाल्यानंतर २५ फेब्रुवारी २०२५ रोजी सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. न्यायालयाने प्रथमदर्शनी पुराव्याची दखल घेऊन २४ सप्टेंबर, २०२१ रोजी आरोप निश्चित करून खटला सुरु केला. या प्रकरणी न्यायालयाने सबळ पुराव्यांची दखल घेऊन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्यामुळे आरोपी संदीप वेर्लेकर याला सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली दोषी ठरविले होते. न्यायालयात सरकारी अभियोक्ता अनुराधा तळावलीकर व रॉय डिसोझा यांनी बाजू मांडली.


हेही वाचा