५३.६८ लाखांचा मुद्देमाल जप्त : सोन्याचे दागिने, वितळलेले सोने, लॅपटॉप जप्त

पेडणे तालुक्यात विविध ठिकाणी चोरी केलेल्या सराईत चोरांना अटक केल्यानंतर पोलीस स्थानकावर आणताना पेडणे पोलीस.
पेडणे : पेडणे पोलिसांनी (Pedne Police) अत्यंत कौशल्याने तपास चक्रे फिरवून दोन सराईत घरफोड्यांना (A seasoned thief) अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीचे सोन्याचे दागिने, वितळलेले सोने, लॅपटॉप आणि गुन्ह्यात वापरलेली वाहने असा एकूण ५३ लाख ६८ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पेडणे पोलीस स्थानकात आयोजित पत्रकार परिषदेत उपअधीक्षक सलीम शेख आणि निरीक्षक नितीन हळर्णकर यांनी ही माहिती दिली.
तुये-पेडणे येथील अनिल कांबळी यांच्या घरात १२ डिसेंबर रोजी झालेल्या चोरीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला होता. तांत्रिक पाळत आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी रोहन महादेव पडवळ (२९, वार्पे वाडो, पेडणे) आणि त्याचा साथीदार जगन्नाथ उर्फ केतन संजय बागकर (२०, रामनगर, कोलवाळ) यांना २६ डिसेंबर रोजी बेड्या ठोकल्या.
बँका, फायनान्स कंपन्यांतून दागिने हस्तगत
तपासादरम्यान आरोपींनी चोरीचे दागिने बँका आणि फायनान्स कंपन्यांमध्ये गहाण ठेवल्याचे समोर आले. पोलिसांनी मुथूट फायनान्स कंपनीच्या पेडणे आणि धारगळ शाखेतून २१.४८ लाखांचे १५१ ग्रॅम सोने जप्त केले. तर बँक ऑफ बडोदा कोलवाळ शाखा आणि पणजी व म्हापसा येथील सोनाराकडून १४.२० लाखांचे दागिने जप्त केले. तसेच रोहन पडवळच्या घरातून १८ लाखांचे दागिने आणि १.२० लाखांचे दोन लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे.
उत्तर गोवा पोलीस अधीक्षक हरिश्चंद्र मडकईकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक नितीन हलर्णकर, उपनिरीक्षक विवेक हलर्णकर, प्रवीण सिमेपुरुषकर, हरीश वायगणकर आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. उपनिरीक्षक प्रवीण सिमेपुरुषकर पुढील तपास करत आहेत.
दिवसा करायचे घरफोड्या
हे दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांनी डिसेंबर २०२४ पासून पेडणे, धारगळ, विर्नोडा, तुये आणि कोरगाव परिसरात दिवसा घरफोडीच्या अनेक घटना घडवल्या आहेत. या दोघांवर पेडणे पोलीस ठाण्यात घरफोडीचे ६ पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत.
आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी
पोलिसांनी आरोपींकडून चोरीसाठी वापरलेले ग्राइंडर कटर मशीन, दोन स्कूटर (यामाहा फॅसिनो व अॅक्टिव्हा) आणि तीन महागडे मोबाईल (दोन आयफोनसह) जप्त केले आहेत. न्यायालयाने दोन्ही आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.