गोवा : तुये येथे भटक्या गुरांना दुचाकी​ची धडक; गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू

आईचा आशीर्वाद घेऊन मुलासह घरी परतताना काळाचा घाला

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
39 mins ago
गोवा : तुये येथे भटक्या गुरांना दुचाकी​ची धडक; गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू

पेडणे : मुलाने बुद्धिबळ स्पर्धेत मिळवलेले यश आणि फिरता चषक आपल्या आईला (आजीला) दाखवून, तिचा आशीर्वाद घेऊन परतणाऱ्या एका पित्यावर काळाने झडप घातली. भटक्या गुरामुळे झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेले पार्से-चावडेवाडा (Parse-Chawdewada) येथील अंकुश नागवेकर (४५) (Ankush Nagvekar) यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. मंगळवारी पहाटे बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अंकुश नागवेकर हे सध्या पेडणे येथे वास्तव्यास होते. रविवार, २१ डिसेंबर रोजी मोरजी येथे पार पडलेल्या पेडणे तालुका मर्यादित बुद्धिबळ स्पर्धेत त्यांच्या मुलाने प्रथम क्रमांक पटकावला होता. मुलाचे हे यश आपल्या आईला दाखवण्यासाठी अंकुश हे मुलासह दुचाकीवरून मूळ गावी पार्से येथे गेले होते. आईचा आशीर्वाद घेऊन आनंदात पेडण्याला परतत असताना, रात्री तुये हॉस्पिटलसमोर हा अपघात घडला.
रस्त्यावर अंधार असताना अचानक एका भटक्या गुराची धडक नागवेकर यांच्या दुचाकीला बसली. यामुळे अंकुश आणि त्यांचा मुलगा रस्त्यावर फेकले गेले. दुर्दैवाने, त्याच वेळी मागून येणाऱ्या एका चारचाकी वाहनाने त्यांना चिरडले. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने बांबोळी येथे हलवण्यात आले, मात्र उपचारांना त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
राजकीय वर्तुळात शोककळा
अंकुश नागवेकर हे ‘गोवा फॉरवर्ड’ पक्षाचे समर्थक होते. जिल्हा पंचायत निवडणुकीच्या कामात ते सक्रिय होते आणि पोलिंग एजंट म्हणूनही काम पाहणार होते. त्यांच्या निधनावर गोवा फॉरवर्डचे नेते दीपक कळंगुटकर यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. एक मनमिळाऊ स्वभाव आणि जिवाभावाचा मित्र गमावला आहे, अशा शब्दांत कळंगुटकर यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या.
गावावर दुःखाचा डोंगर
३० डिसेंबर रोजी स्थानिक स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, लहान मुलगा आणि अशोक, प्रमोद, दीपक, राम व लक्ष्मण हे पाच भाऊ असा परिवार आहे. एका हसत्या-खेळत्या कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. तसेच, भटक्या गुरांच्या वाढत्या समस्येबाबत नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.