पणजीत आंदोलनाचा इशारा : साळ येथील बैठकीला डिचोली, बार्देश, पेडणेचे दुग्ध व्यावसायिकांची उपस्थिती


साळ येथील बैठकीला उपस्थित असलेले दूध उत्पादक.
डिचोली : गेल्या आठ महिन्यांपासून सरकारकडून डिचोली (Bicholim), बार्देश (Bardez) आणि पेडणे (Pernem) या तालुक्यांतील दूध उत्पादक (Milk farmers) शेतकऱ्यांना मिळणारी आधारभूत किंमत मिळालेली नाही. सुमारे २५ कोटी रुपयांची ही रक्कम थकीत असल्याने दूध व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. सध्याच्या महागाईत हा व्यवसाय परवडत नसल्याने, दुधाचे दर वाढवून देण्याची मागणीही प्रलंबित आहे. या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास पणजीत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा साळ-डिचोली येथील बैठकीत दूध व्यावसायिकांनी दिला आहे.
जानेवारीपासून आधारभूत किमतीचे पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांनी जून महिन्यात पत्रकार परिषद घेतली होती. त्यानंतर जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांचे सुमारे ९ ते १० कोटी रुपये वितरित करण्यात आले. मात्र, एप्रिलपासूनचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. ही थकबाकी आता २५ कोटींच्या घरात पोहोचली आहे.
दूध उत्पादनासाठी येणारा खर्च आणि मिळणारा नफा यांचा ताळमेळ बसत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पेंड ३० रुपये किलो, तर कडबा १५-१६ रुपये किलो आहे. गोवा डेअरीकडून सोसायट्यांना प्रति लिटर केवळ ३२-३३ रुपये दिले जातात, तर गोवा डेअरी ग्राहकांना ६० रुपये दराने दूध विकते. खरेदी आणि विक्री दरातील ही मोठी तफावत शेतकऱ्यांच्या मुळावर येत असून, कर्ज फेडणेही आता कठीण झाले आहे.
आम्ही मुख्यमंत्री आणि संबंधित विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला, पण अद्याप तोडगा निघालेला नाही.
- वैभव परब, आमठाणे दूध उत्पादक संस्थेचे अध्यक्ष
२०१२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी खर्चाचा विचार करून ४० टक्के आधारभूत किंमत ठरवली होती. मात्र, त्यानंतर महागाई प्रचंड वाढली असून ही टक्केवारी वाढवणे आवश्यक आहे.
- प्रमोद सिद्ध्ये, दूध उत्पादक
गेली चार वर्षे दुधाचे दर वाढलेले नाहीत. व्यवसाय तोट्यात असल्याने अनेक शेतकऱ्यांनी दूध व्यवसाय सोडला असून काही संस्थाही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
- गोविंद लाडू नाईक, पीर्ण दूध उत्पादक संस्थेचे अध्यक्ष
गेली दोन वर्षे नवीन गायी वाटप करण्यात आलेल्या नाहीत. जुन्या शेतकऱ्यांनी स्वखर्चाने गायी घेऊन व्यवसाय टिकवला आहे, मात्र त्यांच्यावरच आज अन्याय होत आहे.
- आदिनाथ परब, दूध व्यावसायिक