गोवा : बर्च अग्नितांडवाची जलद चौकशी करून खटला चालवा !

दुर्घटनेतील पीडित कुटुंबियांची मागणी : क्लब व्यवस्थापना‍च्या निष्काळजीपणाचा दुर्घटनेला कारणीभूत

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
28 mins ago
गोवा : बर्च अग्नितांडवाची जलद चौकशी करून खटला चालवा !

धुळेर, म्हापसा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाबाहेर बर्च दुर्घटनेतील मयत कुटुंबियांची छायाचित्रे घेऊन न्यायाची मागणी करणारे पीडित कुटुंबीय.

म्हापसा : बर्च बाय रोमिओ लेन क्लबमध्ये (Birch by Romeo Lane Club) फटाक्यांमुळे लागलेल्या आगीत २५ निष्पाप लोकांचा मृत्यू झाला. आमची माणसे ही क्लब व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे दगावली गेली, असा आरोप करीत मयतांच्या पीडित कुटुंबियांनी या प्रकरणाची जलद चौकशी आणि खटला चालवावा, अशी मागणी केली आहे.
मंगळवारी म्हापसा अतिरिक्त न्यायालयात क्लबचे मालक लुथरा बंधू (Luthra brothers) आणि अजय गुप्ता (Ajay Gupta) यांच्या अटकपूर्व जामीन व जामीन अर्जावरील सुनावणीला काही पीडित कुटुंबियांनी हजेरी लावली. सुनावणीनंतर त्यांनी या दुर्घटनेतील संशयितांना कडक शासन करण्याची न्यायालय, पोलीस आणि राज्य सरकारकडे न्यायाची मागणी केली.
नवी दिल्ली येथील भावना जोशी यांनी सांगितले की, क्लबमध्ये प्रवेश केल्यानंतर अवघ्या १५ मिनिटांत काळाने घाला घातला. आग लागली तेव्हा माझे पती लोकांना शांत करत होते. चेंगराचेंगरीत लोकांनी मला बाहेर ढकलले म्हणून मी वाचले, पण माझ्या कुटुंबाला मी वाचवू शकले नाही. चार सदस्यांचे मृतदेह बाहेर काढताना काय वेदना होतात, याची कोणी कल्पनाही करू शकत नाही, असे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले.आम्ही मध्यमवर्गीय आहोत. गोव्याच्या या सहलीसाठी आम्ही वर्षभर पैसे वाचवले होते. पण या एका घटनेने आमचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. आज आम्ही केवळ भावनिकच नाही, तर आर्थिक संकटाचाही सामना करत आहोत, असे भावना जोशी यांनी अश्रूभरल्या नयनांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास जलद गतीने करून आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे.
वाईनच्या ग्लासांनी विझवत होते आग!
या दुर्घटनेत आपल्या कुटुंबातील चार सदस्य गमावलेल्या भावना जोशी यांनी क्लब व्यवस्थापनाचा भीषण निष्काळजीपणा उघड केला. त्यांनी सांगितले की, डीजे कार्यक्रमात फटाके फोडल्यामुळे आग लागली. तिथे आग विझवण्यासाठी यंत्रणा नसल्यामुळे कर्मचारी वाईनचे ग्लास आणि बाटल्यांमधील पाणी फेकून आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. व्यवस्थापनाने लोकांना वाचवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत, असा आरोप त्यांनी केला.
न्यायासाठी गोव्याचे उंबरठे झिजवणार
पीडित कुटुंबाने सांगितले की, न्यायाच्या प्रतीक्षेत ते या महिन्यात दोनदा गोव्यात आले आहेत. एका नामांकित वकिलाने विनामूल्य हे प्रकरण लढण्याची तयारी दर्शवली आहे. क्लब मालक लुथरा बंधू आणि अजय गुप्ता यांच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू असताना, पीडितांनी हा केवळ अपघात नसून व्यवस्थापनाने केलेला नरसंहार असल्याचा आरोप केला.