अरविंद भाटीकर यांचे मत : रमेश कोमरपंत यांना ‘डॉ. शुश्रूत मार्टिन्स स्मृती पुरस्कार’ प्रदान


रमेश कोमरपंत यांना ‘डॉ. शुश्रूत मार्टिन्स स्मृती पुरस्कार’ देऊन सन्मानित करताना अरविंद भाटीकर. सोबत इतर मान्यवर.
पणजी : शेजारील महाराष्ट्र (Maharashtra) किंवा कर्नाटकच्या (Karnataka) तुलनेत गोव्यातील बारचे (Liqueur bar in Goa) प्रमाण अधिक असून दर ८ हजार लोकांमागे एक बार असे चित्र आहे. नाईट क्लबची (Night club in Goa) कायदेशीर तरतूद नसतानाही राज्यात २०० नाईट क्लब सुरू आहेत. विकासाच्या नावाखाली पर्यावरण आणि संस्कृती विनाशाच्या उंबरठ्यावर आहे. या पार्श्वभूमीवर, निवृत्त न्यायाधीश फेर्दिन रिबेलो (Justice Ferdino Rebello) यांच्या आवाहनानुसार, गोवा वाचवण्यासाठी गोवा मुक्ती आणि जनमत कौलाप्रमाणेच एका मोठ्या जनआंदोलनाची गरज आहे, असे प्रतिपादन साहित्यिक आणि समाज कार्यकर्ते अरविंद भाटीकर (Arvind Bhatikar) यांनी केले.
पर्वरी येथील थॉमस स्टीफन्स कोंकणी केंद्रात आयोजित ‘डॉ. शुश्रूत मार्टिन्स स्मृती पुरस्कार’ वितरण सोहळ्यात मुख्य पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी रमेश कोमरपंत यांना ‘डॉ. शुश्रूत मार्टिन्स स्मृती पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. साहित्यिक ॲड. उदय भेंब्रे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, तर पांडुरंग फळदेसाई सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. थॉमस स्टीफन्स कोंकणी केंद्र आणि संजना पब्लिकेशन यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कॅसिनो, क्लब, बारमुळे गोव्याची संस्कृती नष्ट!
अरविंद भाटीकर पुढे म्हणाले की, गोव्यात पोर्तुगीजांची राजवट होती. पोर्तुगीजांना हाकलून गोवा मुक्त करण्यासाठी जनआंदोलन झाले आणि परिणामी १९ डिसेंबर १९६१ रोजी गोवा मुक्त झाला. त्यानंतर गोव्याचे स्वतंत्र अस्तित्व टिकवण्यासाठी ‘ओपिनियन पोल’च्या माध्यमातून लढा दिला गेला, ज्यामुळे गोव्याची अस्मिता वाचली. मात्र, आता कॅसिनो, नाईट क्लब आणि बारमुळे गोव्याची संस्कृती नष्ट होत आहे.
न्या. फेर्दिन रिबेलोंचे आवाहन अत्यंत योग्य!
जमिनीची विक्री, जमिनींचे बेकायदा रूपांतरण आणि अनधिकृत बांधकामांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. या पार्श्वभूमीवर माजी न्यायाधीश फेर्दिन रिबेलो यांनी जनआंदोलन उभारण्याचे जे आवाहन केले आहे, ते अत्यंत योग्य आहे. गोवा वाचवण्यासाठी आता पुन्हा एकदा जनतेने एकत्र येण्याची गरज आहे, असे अरविंद भाटीकर म्हणाले.