एएनसीची कारवाई : रोख ११ हजार रुपये जप्त

पणजी : गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) हणजूण येथील एका भाड्याच्या घरावर छापा टाकून मोहम्मद लतीफ कुनाश या काश्मिरी युवकाला अटक केली. त्याच्याकडून १.३६ लाख रुपये किमतीचे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्ज आणि रोख रक्कम जप्त केली.
एएनसीने दिलेल्या माहितीनुसार, राऊतवाडा - हणजूण येथील एका भाड्याच्या घरात राहणारी व्यक्ती ड्रग्ज तस्करीत गुंतल्याची माहिती गुप्तहेरांनी दिली होती. त्यानुसार, एएनसीचे पोलीस निरीक्षक सगुण सावंत यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक सुनील फालकर व इतर पथकाने ३१ डिसेंबर २०२५ रोजी मध्यरात्री २.१५ ते सकाळी ७.३० दरम्यान राऊतवाडा - हणजूण येथील एका भाड्याच्या घरात छापा टाकला. त्यावेळी पथकाने मोहम्मद लतीफ कुनाश या काश्मिरी युवकाला ताब्यात घेतले. घराची झडती घेतली असता, पथकाने त्याच्याकडून २४ हजार रुपये किमतीचे २.८ ग्रॅम चरस, २८ हजार रुपये किमतीचे २.८ ग्रॅम अॅक्टेसी, २८ हजार रुपये किमतीचे २.८ ग्रॅम मेथाफेमेथामाईन आणि ४५ हजार रुपये किमतीचे ०.१८ ग्रॅम ९ एलएसडी बोल्ट पेपर जप्त केले. तसेच ११ हजार रोख रक्कम जप्त केली. उपनिरीक्षक सुनील फालकर यांनी संशयित मोहम्मद लतीफ कुनाश याच्याविरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्याच्या कलम २०(बी)(ii)(ए), २२(बी) आणि २२ (सी) अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करून कारवाई केली.