बर्च क्लब दुर्घटना प्रकरण : पोलिसांनी खोट्या आरोपांमध्ये गोवल्याचा दावा

म्हापसा : हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन दुर्घटना प्रकरणी हणजूण पोलिसांनी अटक केलेला क्लबचा मुख्य महाव्यवस्थापक राजीव कुमार मोडक (दिल्ली) याने जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर म्हापसा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात दि. ५ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.
दि. ६ डिसेंबर रोजी भीषण आग दुर्घटना घडली होती. दुर्घटनेत २५ लोकांचा मृत्यू, तर ६ जण जखमी झाले होते. घटनेच्या दुसऱ्या दिवशी ७ रोजी संशयित आरोपी अर्जदार राजीव कुमार मोडक समवेत तिघांना अटक केली होती. सध्या अर्जदार कोलवाळ कारागृहातील न्यायालयीन कोठडीत आहे.
मोडक याने जामीन अर्जात म्हटले की, त्याची नियुक्ती इंदूर-मध्यप्रदेशमधील रोमिओ लेन फ्रॅन्चायझीमध्ये होती. गोवा आस्थापनाच्या कार्यात्मक, प्रशासकीय किंवा निर्णय प्रक्रियेत त्याची कोणतीही भूमिका नव्हती. दुर्घटनेच्या अवघ्या चौदा दिवस अगोदर तो थोड्या काळासाठी गोव्यात आला होता. आपत्कालिन संदेश मिळाल्यावर आपण घटनास्थळी पोहोचलो असता तिथून मला अटक करण्यात आली, असे मोडक याने या अर्जात नमूद केले आहे.
अर्जामध्ये मोडक याने असेही म्हटले की, मी मुख्य महाव्यवस्थापक असूनही ऑपरेशन हेड आणि असोसिएट उपाध्यक्ष- सर्व्हिस यांच्या हाताखाली काम करत होतो. ते दैनंदिन कामकाजाची जबाबदारी सांभाळत होते. दैनंदिन व्यावसायिक व्यवहार आणि कार्यक्रमांशी संबंधित निर्णय फक्त असोसिएट उपाध्यक्ष - सर्व्हिस हेच घेत होते.त्यामुळे आपला जामीन अर्ज मंजूर करावी, अशी मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली आहे.
या अर्जावर न्यायालयात मंगळवार, दि. ३० रोजी सुनावणी झाली. अर्जदाराच्या वतीने न्यायालयात अॅड. विनायक पोरोब यांनी युक्तीवाद केला. त्यानंतर पोलिसांना म्हणणे मांडण्यासाठी न्यायालयाने पुढील सुनावणी ५ जानेवारी निश्चित केली.
आपणास बेकायदेशीरपणे अटक : मोडक
हणजूण पोलिसांनी खोट्या आरोपांमध्ये आपल्याला गोवले आहे. त्यांनी बेकायदेशीरपणे मला अटक केली आहे. यामुळे माझ्या वैयक्तिक स्वातंत्र्याचे उल्लंघन झाले आहे, तसेच मला त्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे, असा दावा राजीव कुमार मोडक याने या जामीन अर्जात केला आहे.