चार महिन्यांपासून रकमेच्या प्रतीक्षेत; त्वरित देण्याची मागणी

वाळपई : डिचोली तालुक्यानंतर सत्तरी तालुक्यातील दूध उत्पादकांना गेल्या चार महिन्यांपासून दुधाची आधारभूत रक्कम मिळालेली नाही. यामुळे दूध उत्पादकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्वरित रक्कम न दिल्यास डिचोली व सत्तरी तालुक्यांतील दूध उत्पादकांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
सत्तरी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुधाचे उत्पादन होत असते. अनेक दूध उत्पादक संस्थांच्या माध्यमातून दूध उत्पादकांना सरकारच्या योजनेअंतर्गत आधारभूत रक्कम मिळत असते. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून दूध उत्पादकांना याचा लाभ झालेला नाही. अनेकदा बँकेमध्ये जाऊन याबाबत चौकशी केली मात्र, अजून पर्यंत ही रक्कम खात्यावर जमा झालेली नाही. यामुळे दूध उत्पादकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
सत्तरी तालुक्यात सुमारे ६० पेक्षा जास्त दूध उत्पादक संस्था गोवा दूध उत्पादक संघाला दूध उत्पादन करून पुरवठा करतात. शेकडो शेतकरी यामध्ये कार्यरत आहेत. कामधेनू योजनेअंतर्गत अनेकांनी दूध उत्पादन वाढवण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे. सरकारच्या योजनेअंतर्गत दूध उत्पादकांना आधारभूत किंमत मिळते. गेल्या चार महिन्यांपासून ही रक्कम अद्याप मिळालेली नाही.
दूध उत्पादकांच्या अडचणीत वाढ
* गोव्यात हिरवा चारा मिळणे कठीण झाले आहे. कर्नाटकातील घाट माथ्यावरून येणारा चारा पुरवठा बंद झाल्याने उत्पादकांचे हाल होत आहेत.
* सरकारच्या चारा निर्मिती योजना अद्याप कागदावरच असल्याचे चित्र आहे.
* हिरव्या चाऱ्यासाठी करावा लागणारा अतिरिक्त खर्च आणि कामगारांच्या वाढलेल्या रोजंदारीमुळे दुग्ध व्यवसायाचे गणित कोलमडले आहे.